बुलढाणा, 24 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलेले जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे याचा आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. धाड परिक्षेत्रातील एका शेतकर्याने शासनाच्या हमी भाव केंद्रावर विक्री केलेल्या ज्वारीचे बिल निघण्यास कोणतीही अडचण येवू नये यासाठी जिल्हा पुरवठा अधिकार्याकडून 70 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती 50 हजार रुपये देण्याचे निश्चीत झाले होते. त्यातील 25 हजार रूपये लाचेचा पहिला हप्ता घेतांना पुरवठा अधिकारी टेकाळे याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. विशेष म्हणजे टेकाळेसोबत देवानंद गंगाराम खंडागळेलाही ताब्यात घेण्यात आले. पुरवठा विभागातून निवृत्त झालेल्या खंडागळेने तक्रारदार शेतकर्यासोबत लाचेचा व्यवहार केला होता. या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज, टेकाळे व खंडागळे या दोघांनाही न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले. आरोपींच्या वतीने अॅड. अजय दिनोदे आणि अॅड. शर्वरी तूपकर यांनी युक्तीवाद केला. 21 जुलै आणि 22 जुलै असे दोन दिवस लाचमागणी पडताळणी करण्यात आल्याचे एसीबीच्या फिर्यादमध्ये आहे. हाच मुद्दा आरोपीच्या वकीलांनी न्यायालयासमोर रेटला. म्हणजे दोनवेळा टेकाळेंना अडकविण्याचा प्रयत्न झाला, असा युक्तीवाद वकीलांकडून करण्यात आला. याशिवाय झाडाझडतीमध्ये काही आढळून आले नसल्याचे न्यायालयासमोर मांडण्यात आले. पुरावे आणि युक्तीवादाच्या आधारावर विशेष न्यायाधीश श्रीमती एम.व्ही. देशपांडे यांनी दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला.