बुलढाणा, 30 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः महाराष्ट्रातील डान्सबार, ऑर्केस्ट्रा बार, लेडीज बार यांचे मालक आणि विदेशी दारू दुकानांचे परवाना धारक राजकारणी यांची यादी जाहीर करण्याची मागणी सामजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. सामजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, महाराष्ट्र राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात डान्सबार, ऑर्केस्ट्रा बार, लेडीज बार सुरू आहेत. तसेच विदेशी दारूच्या दुकानांची संख्याही मोठी आहे. या सर्व व्यावसायिक प्रस्थापनेमुळे सामाजिक, नैतिक आणि युवकांवर होणार्या परिणामांची चिंता राज्यातील जागरूक नागरिक म्हणून आम्हाला वाटते. या व्यवसायांशी संबंधित जे मालक आहेत, विशेषतः राजकीय पदांवर किंवा प्रभावशाली स्थानावर असलेले लोक, त्यांची नावे जनतेपुढे आणली गेली पाहिजेत. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता येईल आणि लोकांना खरे सत्य समजण्यास मदत होईल. महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत डान्सबार, ऑर्केस्ट्रा बार, लेडीज बार यांचे मालक आणि परवाना धारक यांची यादी शासनाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात यावी. महाराष्ट्रात विदेशी दारू विक्री करणार्या सर्व दुकानांचे लायसन्सधारक आणि त्यामध्ये जर कोणी राजकारणी, आमदार, खासदार, नगरसेवक, किंवा त्यांच्या नातेवाईकांचा सहभाग असेल, तर त्या व्यक्तींची नावे स्पष्टपणे जनतेसमोर आणण्यात यावीत. या यादीतील माहिती जनतेला सुलभपणे मिळेल अशा स्वरूपात उपलब्ध करून देण्यात यावी. मागण्या केवळ माहिती हक्काच्या दृष्टीने नाहीत, तर शासन व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणि नैतिकता राखण्यासाठी अत्यावश्यक आहेत. लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर आपली खरी ओळख ठेवणे हे लोकशाहीचे मर्म असल्याचे म्हटले आहे. या निवेदनावर सामजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांची स्वाक्षरी आहे.