बुलढाणा, 1 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : धामणदरी भागात राहणार्या सनी सुरेश जाधव (वय 19) याच्या खूनाची पहिली ब्रेकींग गुड इव्हिनिंग सिटीने सर्वप्रथम दिली आहे. या खूनामागची पार्श्वभूमिही गुड इव्हिनिंग सिटीला सुत्रांकडून कळली आहे. प्रेमप्रकरणातून सनीचा जीव गेला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ज्या देवराज माळीवर सनीचा खून केल्याचा संशय आहे, तो मागील तीन दिवसांपासून सनीच्या मागावर होता. ‘तिचा माझा काहीच संबंध नाही’, असे ओरडून ओरडून सनी सांगत होता. परंतु देवराजने आणखी पाच जणासह क्रूरपणे सनीच्या छातीत आणि पोटात चाकू मारले. चिखली रोडवरील संजीवनी मार्बलच्या बाजूला ही खळबळजनक घटना घडली. एक फूल-दो माली, यातून ‘माळी’ने सनीला संपविले असल्याचेही सनीच्या मित्रांनी गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले. दोन दिवसांपासून हंसराज नावाचा मुलगा सनीला धमकावित होता. हंसराज आणि देवराज या दोघांपैकी नेमके कुणाच्या प्रेमात सनी अडसर ठरत होता, हे कळू शकले नाही. परंतु आज, सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सनीला हंसराजसह, देवराज आणि इतर तिघांनी संजीवनी मार्बलच्या बाजूला सुरु असलेल्या एका कंस्ट्रक्शन साईटजवळ गाठले. त्यावेळी सनीसोबत कुणी नव्हते. सनी धामनदरी परिसरातील गौतम नगरचा रहिवासी आहे. त्याला मारणार्यांपैकी बहुतेक त्याच्याच परिसरात राहतात. यातील देवराज माळी हा भिलवाड्यातील आहे. देवराजने सनीवर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. त्याच्या पोटात, बरगडीत, उजव्या पायाला, मांडीवर चाकूने सपासप वार करण्यात आले. रक्तबंबाळ अवस्थेत सनी जमिनीवर पडला. त्यानंतर हे सर्व पाचही जण वेगाने पळून गेले. सनीला हॉस्पीटलमध्ये आणले गेले. परंतु रक्तस्राव अधिक झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयात एकच गर्दी झाली. इकडे सनीच्या घराकडेही पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सर्व पाचही आरोपी फरार आहेत. बुलढाणा पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. हल्ला करणार्यांची नांवे गुड इव्हिनिंग सिटीला प्राप्त झाली आहेत. परंतु सदर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही ती घोषित करणार आहोत. सनीचा मोठा मित्रपरिवार जिल्हा रूग्णालयात जमला होता. अनेक जणांना अश्रु अनावर झाले होते.