◾ पळसखेड-पाडळीच्यामध्ये भिषण अपघात
बुलढाणा, 4 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : अजिंठा मार्गावरील पाडळी आणि पळसखेडच्या मध्ये एका भरधाव मोटरसायकलने कावडधाऱ्यांना उडवले. आज पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातामध्ये एक जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. मृतकाचे नाव मुकेश गजानन राठोड (वय 25) असून तो करवंड येथील रहिवासी आहे. कावड यात्रेतील आणखी दोघेजण गंभीर जखमी झालेले आहेत तर मोटरसायकलस्वार दोघांनाही जबर मार लागला आहे. गुळभेली येथे ग्रामसेवक नागपुरे यांच्या पुढाकारातून नव्यानेच शिवमंदिर बांधण्यात आले आहे. काल संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास गुळभेली येथून पहिल्यांदाच बुधनेश्वरला कावड यात्रा निघाली. जवळपास 40 पेक्षा अधिक तरुण या कावडयात्रेत सहभागी झाले होते. बुधनेश्वरला पोहोचल्यानंतर रात्री 12 वाजेच्या सुमारास आरती करण्यात आली आणि त्यानंतर श्रावण सोमवार सुरू झाल्यामुळे कावड यात्रा परतीसाठी रवाना झाली. दरम्यान पळसखेड नागोच्या जवळपास एक भरधाव मोटरसायकल मागून येऊन कावड यात्रेत घुसली. मोटर सायकलने (एम एच 28 बी. झेड 5274) कावडधारी मुकेश राठोडला उडवले. योगेश चव्हाण आणि आणखी एक कावडधारी या धडकेत जखमी झाले. मोटरसायकल स्वार ऋषिकेश काकडे आणि मनोज माळोदे हे दोघेही जबर जखमी झाले. सर्वांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मुकेश राठोड याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. दोन्ही मोटर सायकल स्वार बुलढाणा येथील मुठ्ठे लेआउट मध्ये राहतात. विशेष म्हणजे मोटर सायकलवाले सुद्धा कावडधारीच होते. कावड घेऊन थकल्यामुळे ते मोटर सायकलवर घरी पोहोचत होते. टीबी हॉस्पिटल जवळील शिव मंदिराची कावड यात्रा त्याचवेळी बुधनेश्वरला पोहोचलेली होती. ऋषिकेश आणि मनोज दोघेही याच यात्रेतील कावडधारी होते. अपघातात ठार झालेला मुकेश राठोड दोन मुलांचा पिता आहे. शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या मंदिरातील तो सेवाधारी होता. त्याच्या मृत्यूने करवंड आणि गुळभेलीवासियांवर शोककळा पसरली आहे.