पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांचा कौतुकास्पद निर्णय
बुलढाणा, 8 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : खंडणी मागणार्या पाच पोलिस कर्मचार्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी तडकाफडकी निलंबीत केले आहे. चिखली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढचा तपास सुरू केला आहे. पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी केलेल्या कारवाईबद्दल नागरीक समाधान व्यक्त करीत आहे. कर्नाटकमधील एका वाहनधारक रील्स मेकरला दोन लाखांची खंडणी मागून 1 हजार 500 रुपये पेटीएमद्वारे उकळणार्या पाचही खंडणीखोर पोलिसांना जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी निलंबित केले आहे. या प्रकरणात पाचही आरोपी पोलिसांविरुद्ध चिखली पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.
पोलीस हवालदार गजानन भंडारी (नेमणूक जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा बुलढाणा), पोलीस शिपाई अभय टेकाळे (नेमणूक चिखली पोलीस स्टेशन), पोलीस हवालदार विठ्ठल काळ्से (तत्कालीन नेमणूक महामार्ग पोलीस मदत केंद्र मलकापूर, सध्या पोलीस अधीक्षक कार्यालय), पोलीस शिपाई संदीप किरके (तत्कालीन नेमणूक महामार्ग पोलीस मदत केंद्र मलकापूर, सध्या पोलीस अधीक्षक कार्यालय) व पोलीस शिपाई विजय आंधळे (तत्कालीन नेमणूक महामार्ग पोलीस मदत केंद्र मलकापूर, सध्या पोलीस अधीक्षक कार्यालय) या खंडणीखोर पोलिसांना पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी 22 मे रोजी पदभार स्वीकारल्यानंतर 26 मे रोजी घेतलेल्या पहिल्याच बैठकीत कडक सूचना केल्या होत्या. पोलिसांनी जनतेशी सुसंवाद ठेवून जनतेप्रति सौदार्हपूर्ण व सलोख्याचे संबंध प्रस्थापित करावेत, कर्तव्यादरम्यान प्रलोभनास बळी न पडता कर्तव्य करावे, सामान्य नागरिकांना नाहक त्रास होणार नाही, याची कटाक्षाने खबरदारी घेण्याबाबत आदेशित केले होते. मात्र, पाच खंडणीखोर पोलिसांनी आदेशाचे उल्लंघन केल्याचे समजताच दोषी पोलिसांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. 6 ऑगस्ट रोजी ताज अब्दुल रहेमान रहेमतुल्लाह (वय 23, रा. गांधीनगर, चल्लेकरे, जि. चित्रदुर्गा (कर्नाटक राज्य) यांना पोलिसांनी अडविले आणि खंडणी मागितली. तसेच रक्कम उकळली होती. त्यामुळे त्यांनी चिखली पोलिसांत तक्रार नोंदविली होती.