बुलढाणा, 9 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : देश आणि राज्य प्रमाणेच बुलढाणा जिल्ह्यातही काँग्रेसचे गळती सुरू आहे. विविध निवडणुकांमध्ये पक्षासाठी सक्रिय भूमिका निभावणारा जिल्हा काँग्रेस कमिटीचा हा नेता आता भाजपवासी होत आहे. आज, बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या नेत्याचा प्रवेश होत आहे.
आम्ही काँग्रेस नेते गणेश जाधव अर्थात गणेश सिंग भगवान सिंग राजपूत सातगावकर यांच्या विषयी बोलत आहोत. ज्यांची आजपर्यंतची कारकीर्द काँग्रेसमध्ये गेली आहे. एनएसयुआय तसेच जिल्हा युवक काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या पदांवर उत्कृष्ट काम करणारे गणेश जाधव यांना बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रसिद्धी पदाची जबाबदारी मिळाली होती. गाव बनाव देश बनाओ, बी.एल. ए. अशा कार्यक्रमांमध्ये त्यांनी भर योगदान दिलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने पक्षप्रचार तसेच संघटनेचे काम केले. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सदैव अग्रेसर असणारे गणेश जाधव यांना तीन वेळा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. याशिवाय स्काऊट गाईडचाही पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. भाजपमध्ये प्रवेशाचे कारण विचारले असता गणेश जाधव यांनी गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाने ते प्रभावित आहेत. श्री फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र अग्रेसर होत असल्याने विकासाच्या या प्रवाहाला समर्थ साथ म्हणून भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे जाधव यांनी सांगितले. काँग्रेस पक्षामध्ये कुणाचाही द्वेष, राग किंवा कुणाबाबत नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे राज्य नेते विश्वनाथ माळी आणि जिल्हाप्रमुख विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास, हे आणखी एक कारण भाजप प्रवेशाचे असल्याचे ते म्हणाले. गर्दे हॉल येथील कार्यक्रमांमध्ये जाधव यांचा भाजपा प्रवेश होणार आहे. साधनाश्री कंस्ट्रक्शनच्या रूपाने गणेश जाधव यांचा बराच नावलौकिक आहे हे विशेष.