सोनोशी नदीच्या पूरात वाहून जाणार्याला जावेद आणि आसिफने वाचविले !
सिंदखेडराजा, 10 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) ः तीन महिन्यापूर्वी जम्मू काश्मिरच्या पहलगाममध्ये 28 भारतीयांना आतंकवाद्यांनी ठार केले होते. नांव विचारून धर्माचा अंदाज घेवून पाकिस्तानच्या मुस्लिम आतंकवाद्यांनी हा नरसंहार केला होता. निष्पाप-निरपराध्यांना ठार मारण्याची शिकवण कुठलाच धर्म देत नाही. ईस्लाम धर्मातही अशा अमानवीय दुष्कृत्याला थारा नाही. खरा धर्म माणूसकी शिकवितो.. दूसर्यांना जीवन देण्याचे शिकवितो.. सोनोशीच्या शेख जावेद आणि शेख आसिफ या दोन तरूणांनी जीवाची पर्वा न करता पूरात वाहून जाणार्या व्यक्तीस त्याच्या मोटारसायकलसह वाचविले आहे. त्यांच्या या कृतीने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक तर होतच आहे, परंतु ‘दोन मुस्लिमांनी एका हिंदूचे प्राण वाचविले.. धर्म वाईट नसतो पण माणूसकी श्रेष्ठ असते’, हा संदेश या घटनेतून प्रखरतेने समोर आला आहे.
तालुक्यात कालपासून संततधार पाऊस कोसळत असून नदी-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र पाण्याचा प्रचंड वेग, खळखळणारे प्रवाह आणि धोक्याचा इशारा देणारा निसर्ग अशा गंभीर वातावरणात सोनोशी गावात काल, 9 ऑगस्टच्या सकाळी एक थरारक घटना घडली.
गावाजवळील नदीला अचानक आलेल्या पूरात आपल्या कर्तव्यावर जाणारे एका मोटार सायकलस्वाराचे मोटारसायकलवरील पुराच्या पावसाने संतुलन बिघडले. पाण्याच्या प्रचंड लाटांमध्ये ते वाहून जाण्याची वेळ आली होती. नेमक्या या क्षणी, घटनास्थळी उपस्थित असलेले गावातील दोन पराक्रमी युवक शेख जावेद आणि शेख आसिफ यांनी क्षणाचाही विलंब न करता जीवाची पर्वा न करता पुराच्या लाटांत उडी घेतली.
पाण्याच्या प्रखर प्रवाहाशी झुंज देत, त्यांनी घट्ट पकडून सुरक्षित किनार्यावर आणले. त्यांच्या या धाडसी कर्तृत्वाने संपूर्ण परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. गावकुसापासून ते सोशल मीडियापर्यंत या दोन तरुणांच्या पराक्रमाची चर्चा रंगली आहे. आजच्या या घटनेने केवळ एका जीवाचा बचाव झाला नाही, तर संकटसमयी माणूसकी कामी पडते, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. सोनोशीच्या या जलवीरांनी धर्मद्वेषाच्या भिंतींना खिळखिळे करण्याचे काम केले आहे. ज्याला वाचविले, त्याला वाचविण्याच्या आधी नांव विचारले नाही.. धर्म विचारला नाही.. बस्स त्याला वाचविणे हा एकच धर्म या दोघांच्याही डोळ्यासमोर होता. पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम धर्मियांना विनाकारण लक्ष्य करणार्या कर्मठांच्या तोंडात या दोघांनीही सणसणीत चपराक दिल्याची भावना अनेक मानवतावाद्यांनी व्यक्त केली आहे.