कुणावर संतापले राहुल बोंद्रे??
बुलडाणा, ११ ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : चिखली तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानाची तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, चिखली तालुक्यात शेतकऱ्यांचा आक्रोश, सरकारचे मौन ! चिखली तालुक्यातील मौजे पांढरदेव, अंबाशी, भोरसा-भोरसी, वरखेड आणि आसपासच्या गावांमध्ये ढगफुटी सदृश पावसाने पिके आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकरी संकटात आहेत.
काही दिवसांपूर्वीच भरोसा येथील थुट्टे दांपत्याने आत्महत्या केली होती. या दोन भीषण घटना घडल्यानंतरही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तालुक्यात येऊन फक्त पक्षाच्या कार्यक्रमात हजेरी लावतात, पण शेतकऱ्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करतात !
शेतकऱ्यांच्या पायाशी पडून मतं मागायची, आणि निवडून आल्यावर त्यांनाच लाथा मारायच्या – ही भाजप सरकारची नीती कितपत योग्य ? शेतकऱ्यांचा अंत पाहू नका ! तातडीने, कुठलाही पंचनामा न करता सर्व नुकसानग्रस्तांना सरसकट मोबदला द्या, अन्यथा शेतकऱ्यांचा संताप तुमची हुकुमशाही उध्वस्त केल्याशिवाय थांबणार नाही!
चिखली तालुक्यातील पांढरदेव, अंबाशी, भोरसा-भोरसी, वरखेड आणि आसपासच्या गावांमध्ये येथे ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १.३० दरम्यान मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली. झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गावकऱ्यांच्या घरात पाच ते सात फूट इतके पाणी साचले आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी खर्च करून सोयाबीन , कापूस , तूर, उडीद, मुंग या पिकांची लागवड केली आहे. मात्र ऐन पेरणीनंतर दोन महिन्याचा कालावधी होत नाही तर पांढरदेव येथे ढगफुटी झाली. यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याखाली गेली असून शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच घरांचे, रस्त्यांचे आणि जनावरांचीही प्रचंड हानी झाली आहे. यामुळे ग्रामस्थ आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. सरकारकडे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना योग्य व त्वरित भरपाई द्यावी, शेतकरी व गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी ठोस योजना राबवून पांढरदेवकरांचे अश्रू पुसावेत, तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केली आहे. अन्यथा सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.