बुलढाणा, 11 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) ः आश्चर्य नाही तर काय ! दोन गटात विभागली गेलेली शिवसेना एकमेकांना पाण्यात पाहते. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात विळ्या-भोपळ्याचे वैर आहे. एकमेकांवर आरोपांचे सर्व स्तर दोन्ही गटातील नेत्यांनी सोडलेले आहे. दोन्ही गटातील नेत्यांमध्ये एव्हढे भांडण आहे की, एकत्रीतपणे कुठलाही कार्यक्रम ते शेअर करीत नाहीत. असे असतांना बुलढाण्यात शिवसेना उबाठाच्या आंदोलनात मात्र शिंदे गटाचे ना. संजय शिरसाट, आ. संजय गायकवाड आणि ना. भरत गोगावले, असे तीन दिग्गज नेते सहभागी झाले होते. या तिघांनीही उबाठाच्या आंदोलनात भाग घेतलेला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हे तिघेही उबाठा गटात तर सहभागी होण्यासाठी गेले नाहीत ना ? या तिघांची घरवापसी तर होत नाही ना ? हे झाले कसे ? हाच प्रश्न वाचकांना सतावत असेल. कदाचित गुड इव्हिनिंग सिटीची बातमी खोटी असेल, असाही विचार आपल्याला पडू शकतो. पण थांबा… गुड इव्हिनिंग सिटीने आजवर कधी खोट्या बातम्या दिलेल्या नाहीत, हे आमचे स्पर्धकही मान्य करतात. तिथे सामान्य जनतेचा गुड इव्हिनिंग सिटीवरील असलेल्या विश्वासाबद्दल काय सांगावे ! उबाठाच्या आजच्या आंदोलनात ना. संजय शिरसाट, आ. संजय गायकवाड आणि ना. भरत गोगावले सामिल झाले होते पण खरेखुरे नाही.. तर प्रतिकात्मक जीवंत देखावे होते. ज्याप्रमाणे आ. संजय गायकवाड यांचा कँटीनमधील मॅनेजरला मारहाणीचा व्हिडीओ संपूर्ण देशात गाजला, त्याच रूपात एका आंदोलकाने अभिनय केला. बनियन आणि टॉवेलवर प्रतिकात्मक पद्धतीने सदर आंदोलकाच्या हातात प्लॅस्टीकची पन्नी होती आणि दूसर्या हाताने तो समोरच्या दूसर्या सहकारी आंदोलकाला ठोसा लगावत होता. हे सर्व दृश्य प्रतिकात्मक होते. सिगारेटचे झुरके ओढत एका बेडवर बनीयन-लुंगीवर बसलेले ना. शिरसाट व्हायरल झालेले आहेत. आजच्या उबाठाच्या आंदोलनात ना. शिरसाट यांचाही देखावा तयार करण्यात आला. एकाने शिरसाटांच्या फोटोचा मुखौटा घालून समोर पैशांची बॅग ठेवली होती. हे पैसे आणि दृश्य प्रतिकात्मक होते, हे आपल्या लक्षात आले असेलच. तर तिसरा देखावा रोजगार हमी मंत्री ना. भरत गोगावले यांच्या कथित अघोरी पूजेचा होता. मंत्री बनण्यासाठी गोगावले यांनी तंत्र-मंत्राची पूजा केली असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. गोगावले यांच्या फोटोचा मुखौटा घालून एक आंदोलक पूजा करीत होता. या देखाव्यानेही अनेकांचे लक्ष वेधले. शिंदे गटाचे हे तिनही दिग्गज नेते प्रत्यक्ष रूपात उपस्थित नसले तरी प्रतिकात्मक हजर होते. केवळ हजरच नव्हते तर नेहमीप्रमाणे संपूर्ण आंदोलनात चर्चेत होते, हे विशेष.