कोजागिरीच्या पूर्वसंध्येला बुलढाण्यात ‘अक्षर अक्षर तुझेच आहे..’
बुलढाणा, 30 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः मराठा गझलच्या मंदीरात छोटीशी पणती प्रज्वलित करण्याचा मित्रांगण परिवाराचा अल्पसा प्रयत्न बुलढाणेकर जाणून आहेत. याही वर्षी रसिकांना मित्रांगण परिवारासोबत मराठी गझलांची कोजागिरी साजरी करावयाची आहे. कोजागिरीच्या पूर्वसंध्येला मित्रांगण परिवाराकडून आयोजित आणि कोठारी होंडा प्रायोजित महाराष्ट्रभर तुफान गाजलेला ‘अक्षर अक्षर तुझेच आहे..’ काव्य-गझल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, 5 ऑक्टोबर 2025 रोजी एडेड हायस्कूलच्या आतील प्रांगणात संध्याकाळी 7 वाजता आयोजित हा कार्यक्रम पूर्णपणे निःशुल्क असून सर्वच रसिकांनी या मैफिलीची आनंद घ्यावा, असे आवाहन मित्रांगण परिवाराच्या वतीने करण्यात आला आहे.
मागील नऊ वर्षांपासून मित्रांगण परिवार मराठी गझलांची कोजागिरी साजरी करीत आहे. आतापर्यंत विविध दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी मित्रांगण परिवाराने बुलढाणेकरांना दिली आहे. यावर्षी अपूर्व, नैनेश, अविनाश, सारंग यांच्या मनवेधक सादरीकरणासह आणि राग यांच्या बहारदार संगीत संयोजनात सजलेली ‘अक्षर अक्षर तुझेच आहे..’ ही स्वरचित कवितांची बहार मैफल होत आहे. विशेष म्हणजे का कार्यक्रम निःशुल्क आहे. केशर दूधाचा आस्वाद घेत कोजागिरीच्या पूर्वसंध्येला आयोजित या काव्य-गझल मैफिलीच्या रसग्रहणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मित्रांगण परिवाराच्या वतीने चंद्रशेखर जोशी, नरेन राजपूत, आनंद संचेती, डॉ. राजेश्वर उबरहंडे, डॉ. आशिष खासबागे, कमलेश कोठारी, मनोज बुरड, रणजीतसिंग राजपूत, राहुल (विक्की) चव्हाण्, रितेश खडके (जैन), अभिजीत निंबाळकरर, सुनिता प्रकाश जोशी आदिंनी केले आहे.



