बुलढाणा, 30 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः पुणे तिथे काय उणे, असा वाक्प्रचार आपण नेहमी ऐकतो पण बुलढाणे तिथे काय उणे, असा नवा वाक्प्रचार रूढ करायला हरकत नाही. आर्यन मॅन या अंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेत्यांमध्ये बुलढाण्याचे नांव अद्यापपर्यंत कोरले गेले नव्हते. बुलढाण्याचे विधीज्ञ ॲड. शरद राखोंडे आणि आर्कीटेक्ट संदीप शेळके (राजर्षी शाहू बँक वाले संदीप शेळके वेगळे) या दोघांनी आर्यनमॅन खिताब मिळवून अंतरराष्ट्रीय स्तरावर बुलढाण्याची कॉलर टाईट केली आहे. गुड इव्हिनिंग सिटीला या दोन्ही बुलढाणेकरांचा अभिमान आहे. ज्याप्रमाणे चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे म्हणून नील आर्मस्ट्रॉग आणि एडविन एल्ड्रिन यांची ऐतिहासिक नोंद आहे, तशीच नोंद आता बुलढाण्याचे पहिले फुल आर्यनमॅन म्हणून ॲड. शरद राखोंडे आणि संदीप शेळके यांची राहणार आहे. आर्यनमॅन स्पर्धेत 180 किलोमिटर सायकलिंग, 42 किलोमिटर रनिंग आणि 4 किलोमिटर समुद्रात स्विमींग हे तिनही प्रकार निर्धारीत वेळेत म्हणे 17 तासाच्या आत पूर्ण करावे लागतात. म्हणून आर्यनमॅन स्पर्धा म्हणजे कुणासाठी सरळ सोपी नाही. ‘ये काम नही बच्चों का, इसमें तेल निकल जाता अच्छे अच्छो का..’, असं अनेक जण या स्पर्धेबाबत गमतीनं म्हणतात. पण ‘ईरादे हो अटल तो फिर क्या डरना आज या कल’, या जिद्दीतून राखोंडे आणि शेळके या दोघांनीही दोन दिवसांपूर्वी रविवार,28 सप्टेंबर 2025 रोजी दक्षीण कोरियामध्ये पार पडलेली आर्यनमॅन स्पर्धा जिंकली. निश्चीतच ही स्पर्धा जिंकण्यासाठी अपार कष्ट, कमालीचा संयम आणि हिमालयाएव्हढ्या आत्मविश्वासाची गरज असते. कमी-अधिक तापमानाशी संघर्ष करीत सायकलिंग, रनिंग आणि स्विमींग या तिनही प्रकारामध्ये कुठेच न थांबता, कुठेही कच न खाता जिंकणे सोपे नाही. ॲड. शरद राखोंडे आणि संदीप शेळके या दोघांनी स्वतःला सिद्ध केले आहे. जगभरामधून हजारो स्पर्धक यात भाग घेतात. भारतातूनही बरेचसे आर्यन मॅनसाठी सहभागी होतात. ॲड. शरद यांनी 14 तास 38 मिनीट 20 सेकंद तर संदीप यांनी 15 तास 7 मिनीट 27 सेकंदात स्पर्धा पूर्ण केली. विशेष म्हणजे बुलढाण्याचे मूळ असलेले आणि सध्या छत्रपति संभाजीनगरमध्ये निवास असणारे प्रशांत राऊत हे दुसऱ्यांना आर्यन मॅन झाले आहेत. ते सुद्धा ॲड. शरद आणि संदीप यांच्यासोबत आर्यन मॅन स्पर्धेत होते. नांद्राकोळी येथील मूळ असणारे प्रशांत राऊत हे बुलढाण्याचे पहिले आर्यनमॅन म्हणता येतील परंतु ते मागील काही वर्षांपासून छत्रपति संभाजीनगरमध्ये स्थायिक असल्यामुळे आणि त्यांनी संभाजीनगरवासी असतांना आर्यनमॅन स्पर्धा जिंकली आहे. याबाबत त्यांनीच गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले की, मी आता संभाजीनगरचा रहिवासी झाल्याने खऱ्या अर्थाने बुलढाण्याचे पहिले आयर्नमॅन म्हणून ॲड. शरद राखोंडे आणि संदीप शेळके या दोघांना श्रेय जाते. मागील दीड वर्षांपासून या दोघांनाही मार्गदर्शनाची संधी मला मिळाली. अत्यंत कठीण असलेली ही स्पर्धा तुम्हांला शारिरीक आणि मानसिक दोन्ही बाबतीत सामर्थ्यशाली बनविते. या दोघांनी केवळ आर्यनमॅन हा खिताब जिंकला नसून, जेन-झीला ‘नेव्हर गीव्ह अप’, हा संदेशही दिला असल्याची प्रांजळ भावना श्री राऊत यांनी व्यक्त केली आहे.



