बुलढाणा, 2 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : ऐन दसऱ्याच्या दिवशी नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेहू गावावर शोककळा पसरली आहे. गावातील एका तरुणीचा अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरने बळी घेतला आहे. आज सकाळी 7:30 वाजे दरम्यान शौचाला गेलेल्या 15 वर्षीय गायत्री संजू खंडारेला भरधाव आलेल्या ट्रॅक्टरने अक्षरश: चिरडले. या घटनेनंतर संपूर्ण गावकरी संतप्त असून मंडळ अधिकारी तसेच तलाठी या दोघांनाही निलंबित करण्याची मागणी केली जात आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा उपविभागीय अधिकारी यापैकी कुणीही घटनास्थळी येऊन कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करू असा पवितत्राही सावरगाव नेहुवासीयांनी घेतला आहे. दरम्यान नांदुरा पोलीस स्टेशनचे दोन पोलीस अधिकारी आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालेले आहे. देऊळगाव राजा येथे बालाजी बंदोबस्तासाठी गेलेले नांदुरा ठाणेदार जयवंत सातव सावरगावला पोहोचत आहेत. आरोपी ट्रॅक्टर चालक पोलिसांच्या ताब्यात असून याचा मालक कुणी इमरान असल्याचे समजते. गायत्रीचा मृतदेह रस्त्यावरच असून त्या ठिकाणी तिचे कुटुंबीय शोकविलाप करीत आहेत. अवैध रेती व्यवसायाचा मलकापूर उपविभागामध्ये जोरदार बोलबाला आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी यावर लगाम कसणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.



