बुलढाणा, 8 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : आज संध्याकाळ पासून अनेकांच्या मोबाईलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून धडकत वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा असलेला मॅसेज शंभर टक्का खरा आहे. आज, बुधवार रात्री 12 वाजेपासून पुढील 72 तास वीज कर्मचारी संपावर जात आहेत. अर्थात महावितरण कंपनीने पर्यायी व्यवस्था केली असली तरी विद्युत पुरवठा खंडितचा धोका सांग त्या तलवारीप्रमाणे सतत असणार आहे. त्यामुळे मोबाईल सारखी उपकरणे चार्जिंग करून ठेवावीत तसेच इन्व्हर्टर चार्ज करून ठेवणे, पाण्याच्या टाक्या भरून ठेवणे अशी कामे करून ठेवा, याप्रकारच्या सूचना फिरविल्या जात आहेत.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) मधील सात कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने 9 ते 11 ऑक्टोबर 2025 या कालावधीत तीनदिवसीय संप पुकारला आहे. खासगीकरण आणि पुनर्रचनेच्या मुद्द्यांवरील असंतोषामुळे हा निर्णय घेण्यात आला. या संपामुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये यासाठी महावितरणने आपत्कालीन नियोजन पूर्ण केले असून, सर्व रजा रद्द करत कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (मेस्मा) लागू करून हा संप बेकायदेशीर ठरवण्यात आला आहे. ज्याप्रमाणे बीएसएनएल सारखी सरकारी कंपनी संपवून जिओ या खासगी कंपनीने हात पाय पसारले आणि आता वाट्टेल त्या दरात ग्राहकांना रिचार्ज शिवाय पर्याय उरत नाही त्याचप्रमाणे महावितरणला खाजगी कंपन्यांच्या हातात देऊन ग्राहकांची लूट करण्यात येईल, असा इशारा संपकरी कर्मचाऱ्यांनी नागरिकांना दिला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
सात कर्मचारी संघटनांनी खासगीकरण आणि पुनर्रचनेच्या विरोधात संपाची हाक दिली आहे. व्यवस्थापनाने 6 ऑक्टोबरला अपर मुख्य सचिव आभा शुक्ला आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या उपस्थितीत चर्चा केली. खासगीकरण होणार नसल्याची ग्वाही देऊनही संयुक्त कृती समितीने संप कायम ठेवला. 329 उपकेंद्रांचे खासगीकरण झाल्याचा आरोप व्यवस्थापनाने फेटाळला, ही केंद्रे महावितरणच्या नियंत्रणाखाली असल्याचे स्पष्ट केले.



