बुलढाणा, 1 डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : उद्या मंगळवार, सकाळी 7:30 वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. राजकीय भाषेत आजची रात्र कत्तलची रात्र आहे. अनेक ठिकाणी सुज्ञ मतदार असतात, जे कुठल्याही आमिषाला बळी पडत नाही. पण काही भामटे आणि स्वार्थी मतदार असतात, जे स्वतःला विकतात… थोड्या पैशांसाठी भ्रष्टाचारी नेत्यांना निवडतात. विवेक गहाण ठेवून उमेदवाराच्या दारू-मटणावर ताव मारणाऱ्यांकडून सुंदर समाज निर्मितीची अपेक्षा तरी कशी करायची!!
बुलढाण्यात उद्या नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे. ज्यांना समाजहिताशी काहीही घेणे देणे नाही असे उमेदवार पैसे वाटपाचा खेळ मांडणार यात शंका नाही. आज सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शहरातील इंदिरा नगर भागामध्ये पैसे वाटप होत असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाले आणि त्यानंतर पोलिसांचे पथक काही क्षणातच इंदिरानगर मध्ये दाखल झाले. त्यांनी काही ठिकाणी शोध मोहीम केली राबविली परंतु त्यांना आक्षेपार्ह काहीही आढळून आले नाही. हास्यास्पद बाब म्हणजे पोलिसांची गाडी सायरन वाजवत पोहोचत असेल तर वाटप करणारे पळून जाणार नाही काय!
असो गुड इव्हिनिंग सिटीने निवडणुकी विभागाशी संपर्क साधून फ्लाईंग स्कॉड विषयी माहिती घेतली असता मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी सांगितले की, पैसे वाटप करून मतदारांना प्रलोभन देणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहे आणि यासाठी हेल्पलाईन क्रमांक 9226450680 देण्यात आला आहे. सदर क्रमांकावर संपर्क करून पैसे वाटप तथा इतर काही तक्रारी असल्यास कळवता येतील, अशी माहिती काटकर मॅडम यांनी दिली आहे. अर्थात मतदानाचा पवित्र हक्क संविधानाने आपल्याला दिला आहे. हा हक्क पैसे घेऊन अपवित्र करण्यासोबतच लोकशाहीला धोक्यात आणण्याच्या पापाचे वाटेकरी होऊ नका, असे आवाहन गुड इव्हिनिंग सिटीकडून करण्यात येत आहे.