बुलढाणा, 2 डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) : मतदान करतांनाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याचे प्रकार काही अतिशहाणे करतात. अशा गोष्टी मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेला बाधित करतात. वास्तविक मतदान केंद्र परिसरात आणि केंद्रात सुद्धा व्हिडिओग्राफी तसेच फोटोग्राफीला बंदी असतांना असे व्हिडिओ बाहेर येण्याचे प्रकार रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कठोर उपाययोजना केल्या आहेत. जे कोणी असे करताना आढळतील त्यांच्या विरोधात कडक कार्यवाही करण्याचे निर्देश आयोगाकडून संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अशांना मतदान केंद्राच्या बाहेरचा रस्ता दाखविला जाणार आहे. मतदान करायला जाणाऱ्या मतदारावर बारीक लक्ष ठेवले जाणार असून मतदान करतानाचा व्हिडिओ जर कोणी आपल्या मोबाईल मध्ये घेत असेल किंवा घेत असताना आढळल्यास त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात येणार असल्याचेही माहिती गुड इव्हिनिंग सिटीला निवडणूक विभागाकडून प्राप्त झाली आहे. काही उमेदवारांकडून मतदारांना अशा गैरप्रकारांसाठी उद्युक्त केले जाते. मतदान करतानाचा फोटो दाखवा आणि नंतरच काही ठराविक रक्कम उमेदवाराकडून मतदाराला कबूल केली जाते. त्यामुळेच असले गैरप्रकार घडतात. निवडणूक आयोगाने मतदान व्हिडीओ व्हायरल प्रकारा विरोधात कठोर भूमिका घेतल्यामुळे आता काही उमेदवारांनी वेगळी शक्कल लढवली असल्याचे कळते. गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार मतदाराला स्पाय कॅमेरा असलेला पेन किंवा मनगटी घड्याळ दिले जाणार आहे. मतदाराच्या खिशाला पेन आणि त्या पेनामध्ये छुपा कॅमेरा असणार आहे. पेन असल्यामुळे मतदान केंद्र अधिकारी किंवा संबंधित मतदान कर्मचाऱ्यांना संशय येणार नाही आणि त्या पेनमध्ये असलेला कॅमेरा मतदान करतानाचा व्हिडिओ चित्रबद्ध करेल. त्यामुळे साधा पेन की छुपा कॅमेरा असलेला पेन यातील फरक ओळखणे कठीण असेल पण अशक्य नाही. परंतु जर कोणी अशीही खुरापत करण्याचा प्रयत्न केला आणि तो पकडला गेला तर त्याच्या विरोधात पोलीस कार्यवाही केली जाणार आहे. दोन किंवा तीन हजार रुपये कमावण्याच्या नादात जेलची वारी आणि बदनामी सारी ही परिस्थिती ओढवू शकेल. म्हणून कुणीही असा प्रयत्न करू नये, असे आवाहन गुड इव्हिनिंग सिटीकडून करण्यात येत आहे.



