बुलढाणा, ९ डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः महाराष्ट्राला लाभलेल्या महात्मा फुले, छत्रपती शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समाज सुधारकांच्या मालेतील आजच्या काळातील ज्येष्ठ समाजसेवक, ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ बाबा आढाव यांचे ८ डिसेंबर रोजी रात्री रोजी ८.२५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. अखेर पर्यंत कार्यरत परिवर्तनाच्या चळवळीतील या समर्पित जीवनदानी नेत्याची समाज बदलासाठी केलेल्या दीर्घ संघर्षानंतर वयाच्या ९५ वर्षी प्राणज्योत मालवली. स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, आणीबाणी विरुद्धची चळवळ, एक गाव एक पाणवठा चळवळ, मनू पुतळा हटाव मोहीम, असंघटित वर्गातील कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी पुणे ते दिल्ली सायकल मोर्चाचे आंदोलन या महत्त्वाच्या चळवळीचे ते अर्धयू होते. एक जून १९३० रोजी जन्मलेल्या डॉ.आढाव यांच्यावर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झाले होते. पितृछत्र लवकर हरपल्यावर त्यांची आई बबुताई यांनी अतिशय खंबीरपणे आपल्या सर्व मुलांना वाढवले. बाबा यांनी वैद्यकीय शिक्षणही पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहे. असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे कृतीशील समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने कष्टकरी व श्रमिकांचा बुलंद आवाज हरपला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत. डॉ. बाबा आढाव यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गेल्या सोमवारीच पूना हॅास्पीटलला जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. डॉ बाबा आढाव हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ, सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी होते. असंघटित कामगार, वंचित, कष्टकरी, विशेषतः हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले.
‘हमाल पंचायती’च्या माध्यमातून त्यांनी पुण्यासह महाराष्ट्रातील हमालांना संघटित केले. ‘एक गाव एक पाणवठा’ या क्रांतीकारी चळवळीचे नेतृत्व करत समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या निधनाने कष्टकरी समाजाचा मोठा आधारस्तंभ व मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे. डॉ. बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी आढाव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.



