बुलढाणा, 10 डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.अशोक खरात यांनी जेष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढाव यांच्या विषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. डॉ.अशोक खरात यांनी सांगितले की, खामगाव येथे सहायक निबंधक पदावर कार्यरत होतो. 2005 चे दरम्यान खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त झाले व मी प्रशासक झालो.
बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये वाढ होत नव्हती. अभ्यासानंतर लक्षात आले की उत्पन्नामध्ये अनेक लिकेजेस आहेत.
बाजार समितीमध्ये आलेल्या सर्व धान्याची नोंद होत नव्हती. बाजार समितीमध्ये हमाल व मापारी यांना परवाने दिले जातात व तेच मापारी आलेल्या धान्याचे माप/मोजणी करून त्याचा रिपोर्ट बाजार समितीला करतात.
या हमालमापाऱ्यांचे पोट हातावर असते. काम न मिळाल्यास त्यादिवशी पैसा मिळत नाही.
पावसाळ्यामध्ये पेरणीला सुरुवात झाल्यानंतर शेतकरी बाजार समिती मध्ये माल आणत नाहीत, किंवा आवक अत्यंत कमी असते त्यावेळेस हमाल मापार्यांना उत्पन्न मिळत नाही. अशा वेळेस अडते व्यापारी त्यांच्या अंगावर पैसे देऊन त्यांना उपकृत करतात त्यामुळे सीझनमध्ये त्यांना आडते व्यापाऱ्यांचे ऐकावे लागते व पूर्ण मालाची नोंद न करता कमी मालाची नोंद करून बाजार समितीचा सेस बुडविला जातो.
यावर विचार करून मी एक उपाय केला या हमाल मापाऱ्यांची एक पतसंस्था नोंदणी केली. हमाल मापारी पतसंस्थेमध्ये बाहेरचे ठेवीदार पैसा ठेवणे कठीण होते म्हणून मी जोखीम स्वीकारून आणि आऊट ऑफ वे जाऊन बाजार समितीचा पैसा या पतसंस्थेमध्ये गुंतवला आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या पतसंस्थेमधून हमाल मापारी यांना कर्ज देण्यात आले. त्यामुळे हे हमाल व मापारी अडते व्यापाऱ्यांच्या ऋणातून मुक्त झाले व त्यांनी येणाऱ्या सीजनमध्ये सेसची चोरी होऊ न देता संपूर्ण मालाची नोंद केली. एकाच वर्षांमध्ये बाजार समितीचे उत्पन्न 80 लाखावरून एक कोटी वीस लाखावर गेले. हमाल व मापारी यांना एक प्रतिष्ठा मिळाली.
ही गोष्ट बाबा आढाव यांचे कानावर गेली त्यांनी फोन करून माझे अभिनंदन केले आणि पुण्याला आल्यानंतर जरूर भेटायला या असे आमंत्रण दिले. बरेच दिवस जाता आले नाही परंतु एक दिवस कार्यालयीन कामानिमित्त पुण्याला जाणे झाले आणि बाबांशी बोलणे सुद्धा झाले. परंतु वेळेवर काम आल्यामुळे बाबा आढाव त्या दिवशी पुण्यात नव्हते आणि ती भेट चुकली.
त्यानंतर बाबांच्या भेटीचा योग पुन्हा आला नाही.