बंजारा सेना म्हणते मनोज मेरतच बोगस जात वैधता प्रमाणपत्रांचे सुत्रधार
बुलढाणा, १२ डिसेंबर (गुड इव्हिनिग सिटी) ः अनेकदा कागदोपत्री तक्रार करणार्या बंजारा समाजातील संघटनांनी आज जाहीर पत्रकार परिषद घेवून समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांच्यावर भ्रष्टाचाराचे थेट आरोप केले आहेत. बुलढाण्यात मोठ्या प्रमाणावर दिल्या गेलेल्या बोगस जात वैधता प्रमाणपत्राचे खरे सुत्रधार मनोज मेरत असल्याचे खळबळजनक आरोप अ.भा. बंजारा सेना पक्ष प्रणित आरक्षण बचाव संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष राजेश फकीरा राठोड यांनी केला आहे. काल, विधीमंडळात बोगस जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी राज्य शासनाने दोन अधिकार्यांना निलंबीत केले आहे. त्यातील एक जिल्हा समाज कल्याण अधिकारी अनिता राठोड सुद्धा आहेत. याच अनुषंगाने बंजारा सेनेकडून बुलढाणा जिल्हा जात पडताळणी समितीला धारेवर धरले आहे. राजपूत भामटाचे अनेक बोगस प्रमाणपत्र समितीने दिले आहेत. मेरत यांना बुलढाणा का आवडते, मागील वर्षांपासून बुलढाण्यातच ठाण मांडून का ? केवळ जिल्हा परिषदेतून राज्याच्या समाज कल्याण विभागात, तिथून जात पडताळणी समिती अशा माकडउड्या मेरत मारत असल्याचे राजेश राठोड म्हणाले. मेरत यांनी जवळपास २३ ते २५ कोटींची माया अशाच बोगस प्रमाणपत्रांमधून जमविली असल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे. यावर पत्रकारांनी त्यांना याबाबतचे पुरावे मागितले असता त्यांनी चिखली रोडवर कॉंग्रेस नगरमध्ये दोन ते अडीच कोटींचा बंगला मेरत यांनी बांधला असल्याची माहिती दिली. याशिवाय अनेक ठिकाणी प्लॉटींग आणि शेतजमीन असल्याचेही राठोड म्हणाले. अर्थात याबाबतचे ठोस पुरावे वेळ आल्यावर देवू, असेही त्यांनी सांगितले. बुलढाण्यासारखीच प्रकरणे धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगांव याठिकाणी आहेत. आम्ही आमचा लढा अनेक वर्षांपासून लढतो आहोत. अनेक पदांवर बोगस जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे बोगस लोकांना नोकरी लागली आहे. उच्च शिक्षणातही बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारावर घुसखोरी झाली आहे. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्यावर आरोप करीत. सीईओ गुलाबराव खरात यांनी २ हजार बोगस प्रमाणपत्र दिले आहे. विविध विभागात बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरीला लागलेल्या अनेकांचे पुरावे आहे. त्यांच्यापासून जीवाला धोका असल्याचे राजेश राठोड यांनी सांगितले. या आधी सुध्दा चार पाच वेळा हल्ले झाले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ सुरक्षा किंवा बंदुकीचा परवाना द्यावा अशी मागणी केली आहे. यावेळी एकनाथ चव्हाण, राजेश बन्सीलाल राठोड यांच्यासह इतरांची यावेळी उपस्थिती होती.
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी मनोज मेरत यांनी गुड इव्हनिंग सिटीला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले आहे की, संशोधन अधिकारी जात पडताळणी समितीच्या तीन सदस्यांपैकी एक असतो. समितीचे काम हे अर्ध न्यायीक स्वरूपाचे असते. तीन सदस्य मिळून शासनाचा आदेश आणि कायदा यानुसार निर्णय घेतात. राजेश राठोड यांनी केलेल्या आरोपत कुठलेही तथ्य नाही. त्यांनी माझ्याकडे जे पैसे असल्याचा दावा केला आहे. तेवढे पैसे जर माझ्याकडे असल्याचे शोधून दिले तरी मी त्यांचा आभारी राहिल. सध्या मी जात पडताळणी समिती अकोला येथे कार्यरत आहे. बुलढाणा जिल्ह्याचा अतिरिक्त प्रभार आहे. जात पडताळणी समितीचे काम हे पुर्णतः ऑनलाईन आहे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर संबधितांच्या मेल वर कास्ट व्हॅलिडीटी जाते. त्यामुळे कुणाला जात पडताळणी प्रमाणपत्र वाटण्याचा आणि नेऊन देण्याचा प्रकार शक्य नाही.



