उद्यापासून महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
बुलढाणा, 18 डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा सपाटा लावल्याने महसूल विभागात तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी–कर्मचारी समन्वय महासंघाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले असून, १९ डिसेंबरपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची घोषणा केली आहे. महसूल विभाग निवडणूक आयोगाची दारोमदार आहे. इतर कर्मचारी वर्ग ही निवडणूक प्रक्रियांमध्ये सहभागी असतो. निवडणूकांमध्ये कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले जाते. परंतु यामध्ये सर्वाधिक वाटा महसूल विभागाचा असतो. आता महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची घोषणा केल्यामुळे याचा परिणाम निश्चितच २० डिसेंबरच्या राहिलेल्या नगर पालिका मतदान आणि २१ डिसेंबरच्या मतमोजणीवर परिणाम होऊ शकतो. उद्या १९ डिसेंबर रोजी संध्याकाळी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर जावे लागते. त्यामुळे याबाबत राज्य सरकार सकारात्मक तोडगा काढते किंवा काय निर्णय घेते हे लवकरच कळेल.
महासंघाच्या म्हणण्यानुसार, विधिमंडळात व सार्वजनिक व्यासपीठावर विनाचौकशी निलंबनाच्या घोषणा केल्या जात असून यामुळे महसूल अधिकारी व कर्मचारी दहशतीखाली काम करत आहेत. तसेच विभागाच्या दीर्घकाळ प्रलंबित आर्थिक व सेवाविषयक मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप वाढत आहे.



