◼️ जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाचा हेकेखोरपणा??
◼️कर्मचारी संघटना आक्रमक
बुलढाणा, 15 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) : काम करायचं नसलं की सध्या प्रशासनातील काही अधिकारी किंवा कर्मचारी “आचारसंहिता” हे कारण पुढे करतात. अर्थात कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी आचारसंहिता आडवी येऊ शकत नाही. जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयात 8 एप्रिल पासून पगारबिले पाठवूनही केवळ एक डिजिटल स्वाक्षरीविना सुमारे 12 हजार कर्मचाऱ्यांचे पगार खोळंबले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद कर्मचारी संघटना आणि ग्रामसेवक संघटना आक्रमक झाल्या असून जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाची तक्रार वरिष्ठांपर्यंत करण्यात आल्याचे समजते. मार्च 024 चे वेतन 15 एप्रिल उजाडूनही अद्याप पर्यंत न झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे मासिक गणित कोलमडले आहे. गुढीपाडवा, रमजान ईद, आंबेडकर जयंती सारखे मोठे सण कर्मचाऱ्यांना पगाराविना साजरे करावे लागले. दैनंदिन व्यवहारासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे कोषागार कार्यालयाने तत्काळ वेतन अदा करावे अन्यथा आंदोलन करू असा इशाराही संबंधित संघटनांनी दिला आहे. याबाबत गुड इव्हिनिंग सिटीने कोषागार अधिकारी श्री वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल कट करत “I will call you back later” असा मॅसेज पाठवल्याने त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.