खा. प्रतापरावांकडून खेडेकर आणि तूपकर यांचा खरपूस समाचार
बुलढाणा 14 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः मतदानाला 12 दिवस शिल्लक असतांना लोकसभा निवडणूकीच्या सात-बार्यावर खा. प्रतापराव जाधव यांनी पहिल्यांदा आरोपांचा फेरफार नोंदविला आहे. प्रत्यक्ष नांव न घेता प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र खेडेकर यांना ‘उभरेल’ आणि अपक्ष उमेदवार रविकांत तूपकर यांना ‘गारूडी’ संबोधत प्रतापरावांनी दोघांचाही खरपूस समाचार घेतला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीच्या पदाधिकार्यांची बैठक पार पडली. हॉटेल निवांतमध्ये पार पडलेल्या या बैठकीत इतर नेते ‘निवांत’ दिसत असले तरी खा. प्रतापराव यांचे भाषण जोशपूर्ण झाले. त्यांची राजकीय परिपक्वता आणि निवडणूक लढण्याचा अनुभव पाहता, ज्याअर्थी त्यांनी नरेंद्र खेडेकर आणि तूपकर यांच्यावर थेट हल्ला चढविला, त्याअर्थी त्यांच्या नजरेत बुलढाणा लोकसभा निवडणूकीची तिरंगी वाटचाल होत आहे, यात शंका नाही.
बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीचे आमदार सर्वश्री डॉ. संजय कुटे, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, श्वेताताई महाले पाटील, अॅड. आकाश फुंडकर तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच महायुतीतील घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. खा. प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित ही बैठक ‘हाऊसफुल्ल’ होती. मुख्यमंत्र्यांच्या संबोधनापूर्वी इतर आमदारांनी आपली मनोगते व्यक्त केली. तदनंतर खा. प्रतापराव जाधव बोलले. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात त्यांनी जिल्ह्यात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. यात नदी जोड प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग, स्मार्ट सिटी तसेच आरोग्य क्षेत्रात झालेल्या मोठ्या कामांचा उल्लेख केला. महायुतीच्या पदाधिकार्यांना आवाहन करतांना ते म्हणाले की, कुठल्याही अफवांना बळी न पडता आपली कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत.. विजय आपलाच आहे.. भाजपशी गद्दारी केलेल्यांनी आम्हांला गद्दार म्हणतांना विचार करावा.. आम्ही गद्दारी नव्हे तर उठाव केला, हे सुद्धा ते बोलले. यानंतर त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा समाचार घेतला.
उबाठा गटाचे तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्यावर खोचक टिका करतांना ते म्हणाले की, आम्हांला गद्दार म्हणणार्या या उमेदवाराचा इतिहास तपासा. आपल्या नेत्यासोबत किती वेळा गद्दारी केली.. अडसूळ साहेब असतांना शिवसेनेतून हकालपट्टी झाली… काँग्रेसमध्ये गेले.. त्याठिकाणी नेत्याचं लांगूनचालन करीत अध्यक्ष, सभापती… समाधानी राहिले नाही.. अडीच वर्ष शिवसेना आणि भाजपा वेगळी.. चिखलीत आमदारकीची संधी आहे.. म्हणून माझ्या पाठीमागे लागले.. शिवसेनेत प्रवेश केला.. बातम्या वाचा.. पर शिंदे साहेबांच्या नेतृत्वात भाजप शिवसेनेची युती झाली.. आपलं काही खरं नाही.. श्वेताताई महाले पाटील आमदार आहे.. ही जागा आपल्याला भेटणार नाही.. मग ते उबाठात थांबले… यांची लायकी दूसरी काही नाही.. खडीसाखरच ठेवली आहे.. कोणत्याही माणसाबद्दल यांच्या तोंडातून चांगला शब्द निघत नाही.. कुटे साहेबांनी प्रश्न विचारला की, काँग्रेस यांच्यासोबत दिसते का ? तर भाऊ आयुष्यभर काँग्रेस असतांना काँग्रेसच्या सर्व नेत्यांना शिव्या दिल्या.. आज ते लोकं घराच्या बाहेर निघायला तयार नाहीत, या शब्दांत प्रतापरावांनी खेडेकर यांना धुतले.
अपक्ष उमेदवार रविकांत तूपकर यांनाही खासदारांनी घेरले. ‘दूसरा उमेदवार आमच्यावर आरोप करतो.. आधी शरद जोशीसोबत काम केलं, त्यांनी हकालपट्टी केली मग राजू शेट्टीसोबत गेले त्यांनी हकालपट्टी केली.. आणि आज इकडं शेतकरी संघटनेचा नेता म्हणून बिल्ला लावायचा आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरायचा.. लोकांना केवळ गारूड्याचा खेळ त्यांनी सुरू केलाय.. गारूडी कसा असतो ? डमरू वाजविला की लोक जमा होता..गारूडी वादीचा साप करतो.. लोकांची दिशाभूल करतो.. वादीचा साप करतो.. कागदाच्या नोटा करून दाखवितो.. आणि कार्यक्रम संपला की, स्वतःचं कटूरं काढतो आणि भिक मागतो.. मला एक-एक रूपया द्या.. मला पैसे द्या.. गारूड्याच्या खेळाला लोक क्षणिक भूलतात.. त्याचे मतात रूपांतर होवू शकत नाही..’, असे मांडतांना ते पुढे म्हणाले की, ‘याच्यापेक्षा मोठा गारूडी आम्ही मेहकर मध्ये संपवलाय.. मेहकरचा गारूडी आमच्यावेळेस किती मोठा होता हे आमच्या सगळ्या लोकांना माहित आहे.. सुबोध सावजी नावाचा मोठा गारूडी आम्ही आता बिलकुल कुलूपाच्या आत बसवलाय.. एकही संस्था त्याच्याकडे राहिल्या नाहीत.. सगळ्या शिवसेनेकडे आहेत.. म्हणून कुणाच्या अपप्रचाराला बळी पडू नका..’, हे आवाहन करायला ते विसरले नाहीत.