जळगाव जामोद, 7 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : वनपरिक्षेत्रात सलाई गोंद अवैधरित्या जमा केल्याने दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी वनपालाने 10 हजाराची लाच मागितली होती. एसबी ने सापळा रचून वनपाल कलीम शेखला 10 हजाराची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. आरोपीला खामगांव न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले असून पोलिस कोठडी की न्यायिक कोठडी याबाबतचा निर्णय संध्याकाळपर्यंत लागण्याची शक्यता आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी, (प्रादेशिक) कार्यालय, जळगाव जामोद येथे वन विभागाचा सालई गोंद औवध रित्या जमा केलेबाबतचा गुन्हा दाखल असून त्या गुन्हयात आरोपी न करण्यासाठी कलीम शेख, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी, (प्रादेशिक) कार्यालय, जळगाव जामोद हे 10 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करीत असल्याची तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांच्याकडे केली होती. त्यानुसार दिनांक 6 मे रोजी सायंकाळच्या वेळेस सापळा रचण्यात आला, यातील लोकसेवक कलीम शेख, वनपाल यांनी 10 हजार रुपये लाचेची मागणी करून सापळा कार्यवाही दरम्यान तक्रारदार यांचेकडून 10 हजार रूपये लाच रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यावरून त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही ही श्रीमती शितल घोगरे, पोलीस उपअधिक्षक (एसीबी), पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, (एसीबी), सफौ शाम भांगे, पोहेकों प्रविण बैरागी, नापोकों विनोद लोखंडे, जगदीश पवार, पोकों रंजीत व्यवहारे व चालक नापोकों नितीन शेटे व अर्शद शेख यांनी पार पाडली.



