अजीत पवार गटाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे जाहीर वक्तव्य डॉ. शिंगणेंच्या वक्तव्याने खळबळ : पुन्हा एकदा रंगली घरवापसीची चर्चा
बुलढाणा, १९ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) : अजित पवार गटातील आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या ताज्या विधानाने पुन्हा एकदा राजकीय पटलावर खळबळ माजलीय. आमच्या मनातले आणि तोंडातले दोन्हीही नेते शरद पवारच, असे जाहीर विधान करून त्यांनी चर्चांना खुले रान करून दिलंय… ज्या मंचावरून त्यांनी हे जाहीर विधान केलंय तो मंच साधासुधा नव्हता… केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, आमदार धीरज लिंगाडे यांच्यासह शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष माजी आमदार रेखाताई खेडेकर मंचावर होत्या… निमित्त होतं ना. प्रतापराव जाधव यांच्या जिल्हा बँकेच्या वतीनं आज झालेल्या सत्काराचं… जिल्हा बँकेच्या सभागृहात भरगच्च गर्दीत केंद्रीय मंत्र्यांचा सत्कार झाला… या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डॉ. शिंगणेनी सखोल भाषण केलं… संपूर्ण भाषणात त्यांनी बँकेवर आलेल्या संकटांचा पाढा वाचत त्यातून बँकेला यातून कसं सावरलं, याची कहाणी सांगितली खरी पण बोलता बोलता शरद पवार यांच्याविषयी असलेली आत्मीयता आणि आदरभाव ते सांगून गेले… उपस्थित सगळ्यांचे कान टवकारणार नाहीतर काय! कारण शरद पवार यांना सोडून अजितदादा गटात गेलेला आमदार जर शरद पवारांचं कौतुक करत असेल तर खळबळ तर उडणारच. आ. डॉ. शिंगणे म्हणाले की, बरं झालं शिंदे साहेब बाहेर गेले.. त्यांचा कार्यक्रम व्यवस्थित चालला.. नंतर अजीतदादा पवार बाहेर पडले.. म्हटलं आपलाही कार्यक्रम व्यवस्थित करून घेवू.. नेते शरद पवार साहेबच आहेत.. ते तर आमच्या कुणी मनातूनही काढू शकत नाही आणि तोंडातूनही काढू शकत नाही.. प्रतापराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करतात.. पण प्रतापराव बाळासाहेबांना विसरू शकत नाही आणि आम्ही शरद पवारांना.. कारण दोघेही लोकनेते आहेत या शब्दांत डॉ शिंगणेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर मात्र सभागृहात चर्चेचा उधाण आले. तर अनेकांनी जोरदार टाळ्याही वाजविल्या.