बुलढाणा, 17 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) :- जिल्हयातील शेगाव व नांदुरा तालुक्यात केस गळतीच्या रूग्णांची संख्या 197 वर पोहचली आहे. केंद्रातील व राज्यातील तज्ञ सुध्दा याबाबत तपासण्या करण्यासाठी शेगाव व नांदुरा तालुक्यात दाखल झाले आहे. टक्कल व्हायरसने धुमाकुळ घातल्याची परिस्थती निर्माण झाली असतांना अशात मोताळा तालुक्यातील एक युवक केस गळती होत असल्यामुळे बुलढाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी आला होता. आज 17 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास मोताळा तालुक्यातील एका गावातील युवक जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्वचा रोग तज्ञांनी त्यांच्यावर उपचार केल्या नंतर तो परत आपल्या मुळगावी निघून गेला आहे. बदनामीच्या भीतीपोटी आम्ही सदर युवकाचे आणि गावाचे नाव जाहीर करू शकत नाही. याबाबत गुइ इव्हिनिंग सिटीने अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला परंतू शासकीय कामांमुळे ते उपलब्ध होऊ शकले नाही. मोताळा तालुक्यातील एका गावात ही घटना घडल्यामुळे त्याठिकाणी सुध्दा तपासण्या होणार का ? हे येणार्या दिवसात स्पष्ट होईल.