बुलढाणा, 7 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) : एक विवाहिता आपल्या पतीला घेऊन धामणगाव धाड येथील श्यामराव बाबाच्या मठात दर्शनासाठी जाते. नेहमीच त्याठिकाणी दर्शनाला येणे जाणे असल्याने तेथे भोंदूबाबाशी ओळख होते. त्यानंतर तो त्या विवाहितेकडे वाईट नजरने बघतो. तेव्हा तो इथेच थांबत नाहीतर त्या दाम्पत्याला काही वर्षांनी मुलगी झाल्यानंतर ती मुलगी माझी आहे म्हणत अधिकार सांगतो. त्यानंतर कायदेशीर नोटीस सुध्दा सोडतो. त्यानंतर न्यायालयातील नोटीस ऐकल्यानंतर तो आपले जीवन संपवतो. ही एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी कहानी आहे. ही घटना इकडे तिकडे कुठे नाही तर आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव धाड येेथील श्यामराव बाबा यांच्या मठाशी संबंधित प्रकरण आहे. याप्रकरणी आरोपी भोंदूबाबा गणेश लोखंडे याला पोलिसांनी गुम्मी येथील मठातून अटक केली आहे.
सुरुवातीला मंदिरात ओळख करून घेतली, नंतर या दाम्पत्याशी सलगी साधून घरी बोलवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात त्याचे इरादे वेगळेच असल्याचे लक्षात आल्यावर दाम्पत्याने संपर्क तोडण्याचा प्रयत्न केला असता त्याचे खरे रुप समोर आले. ही माझीच मुलगी आहे, असे म्हणत तो इतका हट्टाला पेटला आणि दाम्पत्याला त्रास देऊ लागला, की या त्रासाला कंटाळून मुलीच्या पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी (3 मार्च) सायंकाळी घडली. भोकरदन पोलिसांनी भोंदूबाबाला गुम्मी (ता. बुलडाणा) येथील मठातून अटक केली. 30 वर्षीय पित्याने केली आहे. 25 वर्षीय या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तिचे लग्न 2017 मध्ये झाले होते. लग्नानंतर दोघे धामणगाव धाड (ता. जि. बुलडाणा) येथील श्यामराव बाबा यांच्या मंदिरात दर्शनासाठी महिन्यातून एकदा जायचे. या मंदिरात धामणगाव धाड येथीलच भोंदूबाबा गणेश दामोधर लोखंडे हा दिसत असे. काही दिवसांनी या दाम्पत्याची ओळख गणेशसोबत झाली. दर महिन्याला जात असताना कधी कधी या दाम्पत्याला तो त्याच्या घरी चहा पिण्यासाठीही घेऊन जात होता. 27 नोव्हेंबर 2020 रोजी दाम्पत्याला मुलगी झाली. तिला घेऊनही हे दाम्पत्य धामणगाव धाड येथे दर्शनासाठी येऊ लागले.
त्याची नजर खटकली अन्
सन 2023 मध्ये गणेश लोखंडे हा मंदिरात मुलीच्या आईकडे वाईट नजरेने पाहत असल्याचे तिला जाणवले. तिने ही बाब पतीला सांगितली. त्यानंतर या दाम्पत्याने गणेशसोबत बोलणे बंद केले होते. त्यामुळे गणेश विनाकारण या दाम्पत्याला मोबाइलवर कॉल करत होता. ही बाब दाम्पत्याने धामणगाव धाड येथील प्रतिष्ठीत गावकरी भिमराव पायघन, पोलीस पाटील व इतरांना सांगितली. त्यांनी सर्वांनी मिळून गणेशला ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून समजावून सांगितले. मात्र तरीही तो काही एक ऐकत नसल्याने मुलीच्या आईने भोकरदन पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र त्यानंतरही त्याने दाम्पत्याला लेखी पत्र पत्त्यावर पाठविण्यास सुरुवात केली. त्या पत्रात मुलीच्या आई बद्दल अपशब्द वापरायचा. तुमची मुलगी ही माझीच आहे. ती मला पाहिजे. नाहीतर मी तुमच्यावर पाच ते दहा लाखांचा मानहानीचा दावा न्यायालयात दाखल करेल, असे तो म्हणत होता. त्यामुळे तिचे वडील चिंताग्रस्त झाला. त्याला नैराश्याने गाठले. तो पत्नीला म्हणू लागला, की गणेश आपल्याला विनाकारण का त्रास देत आहे
त्या दिवशी थेट नोटीस आली!
25 फेब्रुवारीला सकाळी त्या मुलीच्या वडीलांना वालसा वडाळा येथील घरी पोस्टमन नोटीस घेऊन आला. ही नोटीस मुलीच्या आईने वाचली. गणेश लोखंडे याने बुलडाणा कोर्टातील वकिलामार्फत ही नोटीस पाठवली होती. नोटीसमध्ये त्याने मुलीच्या आईविरुद्ध सहा लाख रुपयांचा मानहानीचा दावा न्यायालयात दाखल करणार असल्याचा उल्लेख होता. मुलीच्या आईने पती घरी आल्यावर त्याला ही नोटीस वाचून दाखवली. त्यानंतर तिचा पती खूप घाबरून गेला. तणावाखाली आला. पत्नीने त्याला धीर देत होती. 3 मार्चला सकाळी 11 वाजता पती घरातून शेतात गेला. दुपारी 1 ला तिला पतीचा कॉल आला. त्याने तिला सांगितले, की गणेश मला फोन करून विनाकारण त्रास देत आहे. आता मी माझ्या जिवाचे बरे वाईट करून घेणार आहे, असे म्हणून त्याने फोन कट केला. नंतर पत्नीने वारंवार कॉल करूनही त्याने उचलला नाही. दुपारी साडेचारला शेतात गर्दी झालेली पत्नीने पाहिली. शेतातील लिंबाच्या झाडाला ज्ञानेश्वरने दोरीने गळफास घेतला होता. गावातील लोकांनी दोरी कापून त्याला फासावरून काढत भोकरदनच्या सरकारी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पतीचा अंत्यसंस्कार केल्यानंतर पत्नीने भोकरदन पोलीस ठाण्यात गणेशविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. त्याचा शोध पोलीस निरीक्षक राकेश नेटके यांनी युद्धपातळीवर सुरू केला. तो गुम्मी (ता. बुलडाणा) येथील मठात लपून बसल्याचे कळताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अधिक तपास पोलीस निरीक्षक राकेश नेटके करत आहेत.
जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये शैतान चित्रपटाची कहानी सत्यात उतरली आहे. ज्याप्रमाणे या चित्रपटात भोंदूबाबाच्या भूमिकेतील आर. माधवन हा अजय देवगणच्या मुलीवर हक्क गाजवून तिला सोबत नेण्याचा हट्ट करतो. त्याचप्रमाणे भोकरदन तालुक्यातील एका दाम्पत्याच्या मुलीवरही भोंदूबाबाने दावा ठोकला.