बुलढाण्यातच मिळाली पोस्टिंग
बुलढाणा, 21 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) ः बुलढाणा शहराला विकासात्मक चेहरा मोहरा देण्यामागे, जे प्रशासकीय हात राबलेत त्यामध्ये सर्वात आघाडीवर मुख्याधिकारी गणेश पांडे आहेत. विकास काय असतो आणि तो कसा करावा, याचा आदर्श घडविणारे, एक कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर अधिकारी म्हणून छाप पाडणारे येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांची पदोन्नती झाली आहे. बुलढाणा न.प. मध्येच मुख्याधिकारीपदी त्यांना बढतीने पदस्थापना मिळाली आहे.
गणेश पांडे हे यापूर्वी गट ’ब’ पदावर कार्यरत होते. आता गट ’अ’ संवर्गात त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. नगर विकास विभागाने 20 मार्चला महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब, सहायक आयुक्त गट ब संवर्गातून मुख्याधिकारी गट अ, सहायक आयुक्त गट अ या संवर्गात राज्यातील 76 अधिकार्यांना पदोन्नती दिली आहे. त्यामध्ये बुलढाणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांचा समावेश आहे. माझी वसुंधरा अभियान 2.0 व माझी वसुंधरा अभियान 3.0 आणि 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत राबविलेल्या माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये बुलढाणा नगर परिषदेला अमरावती विभागातून सलग प्रथम क्रमांक मिळवून देण्यात मुख्याधिकारी गणेश पांडे यांचा मोलाचा वाटा आहे. बुलढाण्याच्या समाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण व इतर क्षेत्रातील महत्वपूर्ण कार्यात भर घालणारे निर्णय त्यांनी घेतले. बुलढाणा हे जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण असतांना बुलढाणा हे विकासापासून कोसो दूर होते. आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली बुलढाण्याला विकासाचे मॉडेल बनविण्यासाठी पांडे यांनी विशेष प्रयत्न केले. शहर स्वच्छता, शहर सौंदर्याकरण आणि शहर विकासाच्या दृष्टीने अन्य नगरपालिकांसमोर गणेश पांडे यांनी आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या पदोन्नती बदल विविध स्तरातून मुख्याधिकारी गणेश पांडे यांचे कौतुक होत आहे.