राज्यघटनेच्या कलम 19 मध्ये दिलेले स्वातंत्र्याचे अधिकार म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं ढोबळमानाने वर्णन
केल्या जातं असलं तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आपल्या सर्वांसाठी व्यक्त होण्याची मुभा आहे. बोलण्याचे, ऐकण्याचे,
राजकीय, सामाजिक जिवनात सहभागी होण्याचा अधिकार प्रदान करणारे स्वातंत्र्य म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. याच
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची धुरा ज्या मिडीयाकडे होती तिलादेखील आज उपरोधीकपणे “गोदी मिडीया” म्हणुन संबोधले जाते. वर्तमानपत्रे, न्युज चॅनल यांच्यावर सत्ताधाऱ्यांचे अप्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापीत झालेले असतांना कोणी एखादा
राजकीय परिस्थीतीवर बोलत असेल तर त्याचा तो अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य या वर्गवारीत येणार नाही काय? का
नेते पाहुन बोलण्यावरुन अभिव्यक्ती स्वातंत्र्य का स्वैराचार अशी चाळणी लावता येईल. कंगणावरुन तत्कालीन
सरकारवर टिका करणारे, केतकीवरुन तेव्हाच्या शासनकर्त्यांना हुकूमशाहा संबोधणारे नेते म्हणजे आजचे शासनकर्ते मात्र
आज कामराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत. सामान्य माणसाच्या मनातलं या लोकांनी व्यक्त केलं असेल तर
बिघडले कुठे. आपल्या मताचा पुरेपुर वापर करणारा एखादा बेधडक बोलणारा यांना आपला विरोधक म्हणुन वाटत
असेल व त्याला धडा शिकविण्याच्या बाता केल्या जात असतील तर तेव्हाच्या आणि आताच्या शासनकर्त्यांमध्ये फरक
काय? असा प्रश्न पडतो. कंगणा बोलली नसती तर तिच्यातील भिडणारी महिला दिसुन आली नसती आणि आज तीच
कंगणा अभिनय क्षेत्र सोडुन खासदार झाली नसती. जो होता है अच्छे की लिए होता है, हे काय उगाच गीतेत लिहीलेलं
नाही. त्याबाबतीत केतकी अजुन आहे तिथेच आहे. बहुधा महायुतीतील नाराजांचे संख्याबळ जास्त असल्याने तिच्यासाठी
जागा शिल्लक राहीली नसावी. कंगणा बोलली घरं पडलं तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य अभिशाप वाटत असले तरी आता
खासदार झाल्याने तेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य तिच्यासाठी वरदान ठरल्याचे दिसुन येत आहे. एखाद्याच्या प्रवृत्तीवर बोलणे,
राजकीय स्थितीवर बोलणे स्वैराचार वाटतो मात्र रातोरात दुसऱ्या राज्यातुन सुत्रे हलवुन स्थिर सरकार पाडणे ही अशी
बंडखोरी नव्हे तर क्रांती घडवुन आणण्यात काहीच चुक नाही असा झालेला समज एखाद्याने आपल्या गाण्याच्या
माध्यमातुन जोडला असेल तर तो आरोपी कसा काय ठरु शकतो. याआधी ही राजु नावाच्या युवकाने पन्नास खोके एकदम
ओके नावाचे रॅप साँग तयार करुन संपुर्ण घटनाक्रम शब्दबध्द केला होता. राजुच्या मनात जे आलं ते कामराच्याही मनात
यायला त्यांच्या भेटीगाठी झाल्या असतील का? तो मुंबईला अन हा छत्रपती संभाजीनगरचा मुळात एखाद्या घटनेचा
एकाच पध्दतीने विचार करणारे जसे हे दोघे आहेत तसे अनेकही असु शकतात. आपण केलेली कृती अयोग्य होती हे
लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने दाखवुन दिलंय आणि त्याच जनतेने विधानसभेला आपण योग्य आहोत यावर
शिक्कामोर्तब केलंय. मुळात तुम्ही केलेले कार्य वा कृती योग्य होती का अयोग्य यावर जनता इतकी संभ्रमात असेल तिथे
तुमची स्थिती ही त्यापेक्षा वेगळी नसेल कदाचित. निदान आपणच टिकेचे धनी का होतोय याचाही विचार केला गेला
पाहिजे. टिका करणाऱ्यांनी पातळी सोडुन बोलावे असे नाही, मात्र त्यांनी आपल्यावर बोलुच नये ही एक प्रकारची
हुकुमशाही नाही का? कामरा बोलला म्हणुन तो वाईट मग त्याला मारण्याची भाषा करणाऱ्यांचा सन्मान करावा का?
कंगणा, केतकी, कामरा यांनी बोललेलं जर खेळाडुवृत्तीने घेतलं असतं तर त्यांनाही कदाचित त्याचा पश्चाताप झाला
असता. मात्र कंगणाचे तोडलेलं घर, केतकीला दिलेला तुरुंगवास अन कामराच्या स्टुडीओची केलेली तोडफोड ही एकाच
म्हणीचा निर्देश करते आणि ती म्हण म्हणजे, सच हमेशा कडवा होता है..