◾ अंदाजे 25 ते 30 लाखाचे नुकसान
बुलढाणा, 20 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) : चिखली रोडवरील फूड लव्हर्सच्या विरुद्ध बाजूला असलेल्या एका होम आपला इन्स्टा गोडाऊनला आग लागून सुमारे 25 ते 30 लाखाचे नुकसान झाल्याची घटना थोड्यावेळापूर्वी घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दीपक उगले रिलायन्स आणि सॅमसंग कंपनीच्या होम अप्लायन्सचे काम करतात. सदर साहित्याचे स्पेअर पार्ट साठी त्यांचे चिखली रोडवर गोडाऊन आहे. रात्री दहा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास गोडाऊनला आग लागल्याचे लक्षात आले. बुलढाणा नगर परिषदेचे अग्निशमन वाहन तात्काळ घटनास्थळी पोहोचले. परंतु आग एवढी भडकलेली होती की सुमारे 25 ते 30 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन विभागाच्या वाहनाने आगीला आटोक्यात आणण्यात यश मिळवले. सुदैवाने ही आग आजूबाजूच्या इतर दुकानांपर्यंत पोहोचू शकली नाही. उगले रिलायन्स, बिपीएल, केलविनेटर आणि सॅमसंग अशा विविध कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरचे काम करतात. आजच्या आगीत त्यांचे भले मोठे नुकसान झाले आहे.