◾ महावितरणकडून 5 भाग्यवान ग्राहकांना मोबाईल, स्मार्ट वॉच वितरित
बुलढाणा, 25 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) : ग्राहकांमध्ये विज बिल भरण्याविषयी उत्सुकता वृद्धिंगत व्हावी तसेच ऑनलाइन विजबिल भरण्याला चालना मिळावी यासाठी महावितरण कंपनीकडून लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आज भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसे कार्यकारी अभियंता मंगलसिंग चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी उपकार्यकारी अभियंता विवेक वाघ, सहायक अभियंता पंकज चिंचोळकर, लेखापाल राजेंद्र मंडलिक आदी उपस्थित होते. बुलढाणा उपविभागामध्ये आयोजित या कार्यक्रमामध्ये लकी ड्रॉ काढण्यात आला. बुलढाणा शहरातील तेलंगीपुरा मधील चंद्रकला आनंदराव टाके यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यांना सॅमसंग कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल भेट देण्यात आला. तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस संयुक्तपणे विभागून टिळकवाडी येथील अरविंद दत्तात्रय देशपांडे आणि देऊळघाट येथील हुसेन अब्दुल रज्जाक यांना मिळाले. या दोघांनाही अँड्रॉइड मोबाइल पारितोषिक म्हणून मिळाला. तिसरे बक्षीस एम.पी. चंदन सराफा लाईन आणि वैशाली अशोक घाईट सुंदरखेड यांना विभागून मिळाले. दोन्ही लकी विजय त्यांना स्मार्ट वॉच प्रदान करण्यात आली. सर्व मान्यवरांनी विजेत्यांचे अभिनंदन करत डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन दिले. या योजनेमुळे ग्राहकांमध्ये डिजिटल पेमेंटची सवय लागण्यास मोठा फायदा होत असून, महावितरणच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
लकी डिजिटल ग्राहक योजना’त बुलढाणा उपविभागाचा सक्रिय सहभाग असून सदर योजना १ जानेवारी २०२५ ते ३१ मे २०२५ या कालावधीत लागू आहे. ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरल्यास त्यांना भाग्यवंत विजेत्यांमध्ये समाविष्ट होण्याची संधी मिळत आहे.
योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे मागील वर्षभर (०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४) ऑनलाईन वीज बिल न भरलेले, पण सध्यातरी सलग तीन महिने ऑनलाईन भरणा करणारे ग्राहक पात्र राहतील. ग्राहकाची थकबाकी १० रुपयांपेक्षा कमी नसावी. व्यवहार दरवेळी किमान १०० रुपयांचा असावा. सार्वजनिक पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईट ग्राहक अपात्र असतील.