spot_img

पहलगाम प्रकरणामुळे खा.प्रतापरावांचे लोकनेतेपण अधोरेखीत !

पर्यटकांना घरी सुखरूप पोहोचविणारा संवदेनशील खासदार

बुलढाणा, 26 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः बॅनर, पोस्टरवर स्वतःसमोर नेता हे विशेषण लावून अनेकांना नेता होता येते. किंवा सोशल मिडीया तसेच न्यूज मिडीया मॅनेज करूनही अवतीभोवती सामाजिक अक्कलशून्य असलेले नेते आपण पाहतो. नेतृत्व करणारा नेता पण लोकसमूहाच्या मनावर अधिराज्य करणारा नेता ‘लोकनेता’ ठरतो. विविध सामाजिक घटनांमधून हे लोकनेतेपण आपोआप झळकून येत असते. जसे, पहलगाम हल्ला प्रकरणातून केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव यांचे लोकनेतेपण अधोरेखीत झाले आहे.
1995 पूर्वी जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर पासून सातत्याने लोकप्रतिनिधी म्हणून प्रतापराव जाधव निवडून येत आहेत. तीनदा आमदार आणि आता चौथ्यांदा खासदार, हा त्यांचा रेकॉर्ड बुलढाणा जिल्ह्यात कुणी मोडेल का ? ही शंकाच आहे. खासदार म्हणून दर पंचवार्षिकमध्ये त्यांच्या कार्याचे मूल्यमापन होत असते. रेल्वेच्या मुद्याला घेवून म्हणा किंवा जिल्ह्यात कुठलाही मोठा उद्योग नसल्याचा मुद्दा घेवून विरोधक त्यांच्यावर ‘निष्क्रीय खासदार’ म्हणून अनेकदा टिका करतात. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी केवळ ईच्छाशक्तीच असून फायदा नाही. पण केंद्रीयस्तरावर राजकारण करतांना मिळणारी मर्यादित स्पेस, निधीचा अभाव तसेच वरिष्ठ पातळीवरून पाहीजे तशा सहकार्याचा अभाव, अशी कारणेही विकासकामात अडचणीची ठरतात. खा. जाधव यांची कार्यशैली पाहता त्यांनी प्राप्त संधीतून जिल्ह्यासाठी अधिकाधिक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याविरोधात विरोधकांनी रान पेटविल्यानंतही ते सलग चौथ्यांदा खासदार झाले आहेत. त्यांची राजकीय मुत्सद्दीगीरी इतर जिल्ह्यातील अनेक मोठ्या नेत्यांपेक्षा वरचढ राहिली आहे. मोदींच्या मंत्रीमंडळात स्थान मिळविणे, साधी गोष्ट नाही. त्यांचे पक्षातील वजन स्पष्ट करण्यासाठी हे पुरेसे आहे.
खासदारांची ही चौथी टर्म आहे. 4.0 च्या च्या त्यांच्या या कार्यकाळाला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे. मागील तिनही टर्मपेक्षा अधिक गतिने प्रतापराव काम करीत असल्याचे दिसून येत आहे. आयुष मंत्रालयाला न्याय देतांना अनेक मोठे निर्णय त्याची साक्ष्य आहे. महामहीम राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांची कौतुकाची थाप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले स्नेहबंध खा. प्रतापराव जाधव यांची प्रतिष्ठा उंचावणारे आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी ते धडपडत असल्याचे त्यांच्या दिल्लीतील कामकाजावरून जाणवते. खासदार म्हणून त्यांचे हे कर्तव्यच आहे, असेही काही जण म्हणतील. नेत्याकडे कर्तृत्व असू शकते पण संवेदनशीलता असेलच असे नाही. परिणामी असंवेदनशील नेत्यांना टिकेचा माराही सहन करावा लागतो. ‘भूमिपुत्र’ म्हणून ख्यातीप्राप्त असलेले प्रतापराव असंवेदनशील मुळीच नाही.. संवेदनशीलता जपण्याचा त्यांचा गुणधर्म प्रकर्षाने पुढे आला तो पहलगाम घटनेतून !
22 एप्रिल रोजी जम्मू काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना लक्ष करत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये गोळीबार केला. यामध्ये 28 भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले. मृतकांमध्ये 6 जण हे महाराष्ट्रातील आहेत. शिवाय अनेक पर्यटक जम्मू आणि कश्मीरमध्ये अडकून पडले. तेथील परिस्थितीमुळे ते भयभीत झाले होते लवकरात लवकर घराकडे पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ते आणि त्यांचे कुटुंबीय मागणी करत होते. बुलढाणा जिल्हयातील जवळपास 49 पर्यटक जम्मू काश्मिरमध्ये पर्यटनांसाठी गेले होते. या सर्व पर्यटकांशी संपर्क आणि संवाद साधण्याचे काम प्रतापराव जाधव यांनी केले. दूसर्‍या दिवशी सकाळी थेट जम्मू गाठून त्यांनी, ‘सरकार तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका.. तुम्हाला घरी जाण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्यावतीने व्यवस्था करण्यात आली आहे असं पर्यटकांना दिलासा दिला. त्यांच्यासाठी रेल्वे गाडीची विशेष व्यवस्था करण्यात आली. जम्मू कश्मीर वरून हे पर्यटक दिल्लीकडे रवाना केले आणि त्याठिकाणाहून संबंधित पर्यटकांना त्यांच्या घराकडे पोहचणार्‍या कनेक्टेड रेल्वेचीही खासदारांनी व्यवस्था केली. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी अनेक पर्यटकांनी व पर्यटकांच्या नातेवाईकांनी संपर्क करून घरी सुखरूप पोहोचल्याचे कळविले. एखादा नेता रेल्वेची व्यवस्था करून थांबला असता. पण जम्मू-काश्मिरमध्ये लावून भितीग्रस्त पर्यटकांना दिलासा आणि त्यांना हिम्मत देण्याचे काम खा. प्रतापरावांनी केले. ‘खासदार साहेब आपण व्यवस्था केली होती मग इथपर्यंत येण्याचे कष्ट का घेतले ?’, अशी चिंता काही जिल्हावासियांनी त्याठिकाणी व्यक्त केली होती. पण त्यावरचे खासदारांचे उत्तर त्यांच्यामधील विनयशीलता आणि अहंकारशून्यता प्रकट करणारे आहे. ‘तुम्ही लोकांनी मला चार-चार वेळा खासदार म्हणून दिल्लीत पाठविले.. मी एकदाही तुमच्यासाठी येवू शकत नाही का !’, या शब्दांत खासदारांनी आपल्या संवदेनशीलतेचाही परिचय दिला. संकटात अडकलेल्यांना घरी सुखरूप पोहोचविण्याचे ऐतिहासिक काम त्यांच्या हातून घडले. आजवर त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. पण खासदारकी आणि केंद्रीयमंत्रीपद सार्थकी ठरविणारे तथा त्यांच्यातील लोकनेतपण अधोरेखीत करणारे हे कार्य बुलढाणा जिल्हावासी आजन्म विसरू शकणार नाही, हे मात्र सत्य.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत