बुलढाणा, 26 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) : महाराष्ट्रातील पोलीस सर्वात अकार्यक्षम असून ते हप्तेखोर आहेत असं वादग्रस्त विधान करणारे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आमदार गायकवाड यांच्या विधानाची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती. “आमदार गायकवाड जर वारंवार असं वादग्रस्त विधान करत असतील तर त्यांच्या विरोधात ॲक्शन घेतली जाईल”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनंतर काही वेळातच आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे उद्या रविवार 27 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे बुलढाणा शहरांमध्ये आभार दौऱ्यानिमित्त येत आहेत. श्री शिंदे यांच्या आगमनाच्या काही तासापूर्वीच त्यांच्याच पक्षातील एका आमदाराविरोधात शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याने भाजपा शिवसेनेच्या महायुतीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्री. शिंदे यांच्या आभार दौऱ्यानिमित्त काल, आ. गायकवाड यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना त्यांनी पोलिसांबाबत वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते की, त्यांची गाडी अज्ञातांकडून उडवण्याचा प्रयत्न झाला… घटनेला चार वर्ष लोटली तरीही आरोपीचा अजून पर्यंत पत्ता नाही… मुलाला कोणी धमकी दिली तो आरोपी अजून सापडत नाही… महाराष्ट्रातील सर्वात अकार्यक्षम खाते पोलिसाचे असून यांना फक्त हप्ते वाढवून घेण्यामध्ये स्वारस्य असते… एखादा समाज हिताचा कायदा निघाला तर कायद्याच्या आड पोलीस आपले हप्ते वाढवून घेतात… पोलिसांनी जर खरंच सद्रक्षणाय खलनिग्रहणाय आहे हे तत्व बाळगले तर सगळे सुतासारखे सरळ होतील. पण काही उदाहरण असे आहेत की पोलीस चोराचे पार्टनर होतात… पाच लाखाचा माल मिळाला की नोंद घेताना 50 हजार दाखवली जाते”, असा आशयाचे विधान आमदार गायकवाड यांनी केले होते. महाराष्ट्रातील विविध न्यूज चॅनलवर त्यांचे हे विधान व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत सदर वादग्रस्त विधान पोहोचले. “उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे आमदार गायकवाड यांना समज द्यावी”, या शब्दात श्री फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री पुढे असेही म्हणाले की जर वारंवार आ. गायकवाड असे विधान करत असतील तर त्यांच्या विरोधात ॲक्शन घेतली जाईल. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर काही वेळातच आमदार गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वादग्रस्त विधान करणे, अपशब्द बोलणे, असा आरोप आमदार गायकवाड यांच्यावर आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 296 आणि कलम 352 नुसार आ. गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शहर ठाणेदार श्री राठोड यांनी गुड इव्हिनिंग सिटीला दिली आहे. याबाबत गुड इव्हिनिंग सिटीने आमदार गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मी पोलिसांविषयी वाईट बोललेलो नाही. पोलिसांविषयी जनतेतून ज्या भावना व्यक्त होतात त्याच भावना मी मांडल्या… मी एवढेच म्हटले की पोलीस जर खरंच किमान एकच वर्ष चांगले वागले तर कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित होईल आणि सगळं काही नीट होईल.”, या विधानात काहीही गैर असल्याचे मला वाटत नाही, असेही आ. गायकवाड म्हणाले.