◾ देहू येथील भक्ताची ऑनलाईन फसवणूक
बुलढाणा, 17 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : विदर्भाची पंढरी म्हणून शेगावची ओळख आहे. पण त्याही पलीकडे जाऊन सर्वात मोठी ओळख असेल तर तिथली स्वच्छता आणि निस्वार्थ सेवा आहे. तिथले सेवाधारी सर्वांना “माऊली” म्हणतात. गजानन महाराज संस्थानचा महत्वाचा कणा हा सेवाधारी आहे. त्यांच्या माध्यमातून विविध सेवा दिल्या जातात.
परंतु काही महाठग हे भक्तांना गंडवण्याचे पाप करतात. भक्त निवासात रूम बुक करण्याच्या साध्या बहाण्याने एका कुटुंबाची तब्बल सात लाख २२ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे! ही धक्कादायक घटना देहूरोड येथे २७ ते २९ एप्रिल दरम्यान घडली, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
देहूरोडचे रहिवासी असलेले ४१ वर्षीय राहूल अशोकराव पाठक यांनी १६ मे रोजी या घृणास्पद फसवणुकीबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सतीश शर्मा नावाचा संशयित आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाठक आपल्या कुटुंबासोबत शेगावला श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी उत्सुक होते. त्यांनी भक्त निवासातील सोयीस्कर रूम बुक करण्यासाठी इंटरनेटवर शोध घेतला. याच दरम्यान, त्यांना एका संशयास्पद वेबसाईटवरील दोन मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधण्याचा मोह आवरला नाही. याच ठिकाणी त्यांच्यासोबत मोठा खेळ खेळला गेला. सतीश शर्मा नावाच्या एका धूर्त व्यक्तीने स्वतःला भक्त निवासाचा प्रतिनिधी भासवले आणि पाठक यांना एसी रूम बुकिंगच्या जाळ्यात ओढले. वेगवेगळ्या युपीआय कोडच्या माध्यमातून त्याने पाठक यांच्याकडून तब्बल सात लाख २२ हजार रुपये उकळले. रक्कम हातात येताच या ठगबाजांनी संपर्क तोडला आणि पाठक यांच्या विश्वासाचा अक्षरशः चुराडा केला. आपली आयुष्यभराची कमाई फसवणूक्यांच्या हाती गेल्याने पाठक आणि त्यांचे कुटुंब पूर्णपणे हताश झाले आहेत. आता या फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार वाकसे करत आहेत.