आयजीपी रामनाथ पोकळे बुलढाण्यासाठी रवाना
बुलढाणा, 30 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : कोणता मी झेंडा घेऊ हाती… हा सवाल नव्हे तर कुणाचा झेंडा मी घेऊ हाती हा पेच प्रसंग बुलढाणा जिल्हा पोलिसांसमोर आज सकाळपासून उपस्थित झाला आहे. निलेश तांबे की विश्व पानसरे? कुणाचे आदेश मानावेत आणि कुणाला जिल्हा पोलिस अधीक्षक मानावे? या प्रश्नाचे उत्तर अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्याकडे असावे म्हणून ते बुलढाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. दोन्ही एसपींना एका ठिकाणी बसून आयजी रामनाथ पोकळे हा पेचप्रसंग सोडवतात का? याकडे गुड इव्हिनिंग सिटीची नजर राहीलच. सर्वांना माहीतच आहे की, आज सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास बदलीला स्थगिती मिळालेले एसपी विश्व पानसरे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या केबिनमध्ये येऊन बसले आणि त्यांनी खुर्चीचा ताबा घेतला. याच खुर्चीवर बसून नवीन एसपी निलेश तांबे यांनी काल मध्यरात्री दोन वाजेपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. विशेष म्हणजे श्री तांबे आज सकाळी परेडसाठी पण दाखल झाले होते. इकडे मात्र सकाळीच एस पी पानसरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रवेश करून सगळ्यांना धक्का दिला. मागील चार ते पाच दिवसांपासून पानसरे आजारी रजेवर होते. गृह विभागाने त्यांची बदली अमरावती या ठिकाणी करून त्यांच्या जागी तांबे यांची वर्णी लावली होती. परंतु आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हणत एसपी पानसरे यांनी कॅटमध्ये प्रकरण दाखल केले होते. काही तासातच त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली होती. तेव्हापासून हीच चर्चा सुरू आहे आता नेमके बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कोण कार्यभार सांभाळणार? तर दुसरीकडे तांबे यांनी रातोरात बुलढाणा गाठून बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे आपल्या हातात घेतली होती. विशेष म्हणजे त्यांनी मागील तीन ते चार दिवसांपासून कार्यभारी सुरू केलेला आहे. आज जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या केबिनचा ताबा श्री पानसरे यांनी घेतल्यामुळे श्री तांबे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक श्री महामुनी यांच्या केबिनमध्ये बसून आजच्या कामकाजाला सुरुवात केली असल्याचे कळते. विशेष म्हणजे दोन्ही केबिन मधून बेलचे आवाज येत आहे. मग कोणत्या केबिनमध्ये आधी जावे असा मोठा पेच अधिनस्त अधिकाऱ्यांना पडला आहे