बुलढाणा, 20 जून (गुड इव्हिनिंग सिटी) ः आधी मनसे आणि आता भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते अनिलकुमार अयोध्याप्रसाद तिवारी, ज्यांना बुलढाणेकर राज तिवारी म्हणून ओळखत होते, त्यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने एका तासापूर्वी 46 वर्षीय राज तिवारी यांची प्राणज्योत मालवली. मागील दोन दिवसांपासून दम्याच्या त्रासामुळे ते येथील एका खाजगी हॉस्पीटलमध्ये भर्ती होते. अतिवजनामुळे त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या होत्या. आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास हॉस्पीटलच्या बाथरूममध्येच त्यांना कार्डियाक अरेस्ट आला. हा झटका इतका तिव्र होता की, डॉक्टर आणि त्यांच्या पथकाने प्रयत्न करूनही त्यांना वाचविता आले नाही. त्यांच्या निधनवार्तेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मनसेच्या बुलढाणा जिल्हा विस्तारात त्यांचे मोठे योगदान होते. बुलढाणा शहरात त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. मनसेत असतांना त्यांनी विविध जनआंदोलनाद्वारे प्रशासन आणि लोकांचे लक्ष वेधले होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. पक्षीय वलयाबाहेर त्यांनी अनेकांची मैत्री होती. त्यांचा प्लॉटिंग आणि इस्टेट ब्रोकींगचाही व्यवसाय होता. ‘मित्रांचा मित्र’ म्हणून राज तिवारी यांचे अनेकांशी मित्रत्व होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तसेच दोन भावंडांसह मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी त्रिशरण चौक, संगम तलाव स्मशानभूमिमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे.