“माझी घोषणा आधी होती… बैलजोडी देणारच ” : आ.गायकवाड
बुलढाणा, 5 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) : वृद्ध शेतकऱ्याच्या खांद्यावर औताचे जु ओढतांनाचा व्हिडिओने राज्यभर खळबळ उडवलेले असतानाच आमदार संजय गायकवाड यांनी सदर शेतकऱ्याला बैल जोडी देणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वीच केली होती. आज, शनिवारी बैल जोडी सुपूर्द करण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आलेला असतानाच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याकडून एक दिवस पूर्वीच शेतकऱ्याला बैलजोडी देण्यात आली आहे. संजूभाऊंच्या आधी तुपकरांची बैलजोडी लातूरात पोहोचली आहे. त्यामुळे ही खोडी की, योगायोगाची घडी आहे, याची सर्वत्र चर्चा होत आहे. विशेष म्हणजे आमदार संजय गायकवाड सुद्धा बैलजोडी देण्यावर ठाम आहेत. आता वृद्ध शेतकरी अंबादास पवार यांच्या कोर्टात चेंडू आहे. ते तुपकरांची बैलजोडी ठेवतील की, आ. गायकवाड यांची? हे आज दुपारपर्यंत कळेल.
बैल नाही म्हणून वृद्ध शेतकरी औत ओढतोय आणि पत्नी कोळपणी करतेय, हा बळीराजाच्या दुर्दशेची विदारक कहाणी मांडणारा व्हिडीओ महासत्तेचे स्वप्न पाहणार्यांना व व्यवस्थेला झणझणीत अंजन घालणारा आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीया वर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातून विविध प्रतिक्रिया आल्या पण याला अपवाद ठरला तो बुलढाणा याचे कारण म्हणजे ते दृष्य पाहिल्यानंतर बुलढाण्यातील संवेदनशीलता यामध्ये दिसून आली. आ.संजय गायकवाड यांनी त्या लातुर जिल्ह्यातील कुटुंबाला बैल जोडी देणार असल्याचे सांगितले. पण त्या आधीच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी त्या शेतकर्याला काल बैलजोडी घेवून दिली. त्यामुळे बुलढाण्यातील या राजकीय नेत्यांची माध्यमातून संवेदनशीलता दिसून आली. पण आज शनिवार, 5 जुलै रोजी आमदार संजय गायकवाड हे स्वतः अहमदपूर तालुक्यात जावून बैल जोडी देणार असल्याचे त्यांनी सांगितले असल्यामुळे ते आज बैल जोडी देणार आहे.
माझी घोषणा आधी होती… बैलजोडी देणारच ” : आ.गायकवाड
गुड इव्हिनिंग सिटीने आमदार संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी गुरूवारी घोषण केली की, शनिवारी त्याठिकाणी जावून बैल जोडी देणार आहे. मी त्या शेतकर्यांसोबत बोललो होतो तेव्हा त्यांनी सांगितले की, आम्हाला बैल जोडी पाहिजे. तर मी बैल जोडी घेवून येणार आहे. दुसर कोणी देणार असेल तर त्यांनी दुसरी काही मदत करावी असे सांगितले. त्यामुळे परवाच्या दिवशी लातुर तालुक्यातील आमचा जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख त्यांना भेटून कर्नाटक राज्यात जावून बैल जोडी बघितली आणि काल ते बैलजेाडी घेवून आले. बैल जोडी धुवून, सजवून ठेवली आहे. मी अर्ध्या तासात त्याठिकाणी पोहचणार आहे. मी माझ्या स्टेटमेंट मध्ये वेळ आणि दिवस ही सांगितलेला आहे. मी आता पोहचल्यानंतर त्यांना बैल जोडी सुर्पद करतो. त्यांना सांगतो की, दोन्ही बैलजोडी हाणून पहा जी ही जोडी तुम्हाला योग्य वाटेल ती ठेवा आणि दुसरी विकून टाका असे त्या शेतकऱ्याला सांगणार असल्याचेही ते म्हणाले.
… हे तर आमचे कर्तव्यच- रविकांत तुपकर
राज्यातील कोणत्याही शेतकर्यास अडचण असेल तर संघटना धावून जाईल. सरकारने घोषणा केल्या. मात्र ते मदत करू शकले नाही. अभिनेता सोनू सूद यांनीही मदतीची घोषणा केली आहे. शेतकरी जगला पाहिजे यासाठी आम्ही काम करत आहोत. तुम्ही धन्यवाद मानू नका. आमचे कर्तव्य आहे. कुठलीही अडचण आल्यास संपर्क करा. तुम्ही एकटे नाहीत. मी कायम तुमच्या पाठीशी आहे, असे अभिवचन रविकांत तुपकर यांनी आभार मानणार्या पवार दाम्पत्याला दिले.