बुलढाणा, 19 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः बुलढाण्याच्या एका मदरशात येमेनचे नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याचा दावा राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी केल्यानंतर बुलढाणा जिल्हा पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. तर बुलढाणेकरांच्या भुवया उंचावल्या होत्या. राज्याचे लक्ष परत एकदा बुलढाण्याकडे लागले होते. सुसंस्कृत आणि बंधुभाव जपणार्या बुलढाणा जिल्ह्यात दहशतवादी कारवाया करणारे दहशतवादी राहतात, या विचाराने चिंतीत झालेल्या बुलढाणेकरांसाठी गुड इव्हिनिंग सिटी दिलासादायक बातमी देत आहे की, ज्या मदरशात येमेनेचे नागरिक सापडलेत, तो मदरशाच मुळात बुलढाणा जिल्ह्यात नाही. मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेले विधान अर्धसत्य निघाले. येमेनचे नागरिक बेकायदेशीर राहत असल्याचे खरे आहे, परंतु ते बुलढाणा जिल्ह्यात नव्हे तर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुआ येथे ! विशेष म्हणजे ही घटना चार महिन्यापूर्वी, फेब्रुवारी 2025 ची आहे. येमेन हा देश सौदी अरेबियाच्या शेजारील राष्ट्र आहे. समुद्रमार्गे थेट हा देश महाराष्ट्राशी कनेक्टेड आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे जामीय इस्लामिया इसातूल उलुम या धार्मिक शिक्षण देणार्या संस्थेच्या मदरशामध्ये येमेन देशातील दोन नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचे समोर आल्यानंतर गृह विभागाने एटीएसच्या माध्यमातून या संस्थेची चौकशी सुरू केल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी बुधवारी, 16 जुलै रोजी विधानसभेत दिली होती. या संस्थेत 728 कोटी रुपयांची मोठी उलाढाल झाली असल्याने हे प्रकरण ईडीकडे चौकशीसाठी देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गृहविभागाने धर्मादाय आयुक्तांकडेही चौकशीसाठी हे प्रकरण दिल्याचे भोयर यांनी सांगितले होते.आमदार देवेंद्र कोठे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी मांडली होती. येमेन देशातून आलेल्या व्यक्तींच्या व्हिजाची मुदत 19 फेब्रुवारी 2016 रोजी संपूनही त्या या संस्थेच्या मदरशात राहत होत्या. त्यामुळे या मदरशाची मान्यता रद्द करण्याची मागणी कोठे यांनी केली. या संस्थेने आदिवासी समाजाच्या जमीन बळाकवल्या आहेत, तसेच शिष्यवृत्तीत घोटाळाही केल्याचा आरोप कोठे यांनी केला.
याच घटनेचा धागा पकडून आज, नितेश राणेंनी नंदुरबार ऐवजी बुलढाण्याचा उल्लेख करून बुलढाण्याचे वातावरण तापवून टाकले. मागील आठवड्यात आ. संजय गायकवाड यांच्याकडून कँटीन चालकाला मारहाणीच्या घटनेने बुलढाणा देशाच्या पटलावर झळकले होते. आता पुन्हा राणेंनी बुलढाण्याचा दहशतवादी संबंधाने बुलढाण्याच्या मदरशाचे नांव घेवून बुलढाण्याला हायलाईट केले. गुड इव्हिनिंग सिटीने सदर बातमीची खातरजमा करून सत्य समोर आणले असून याबाबत जिल्हा पोलिस प्रशासनातील एका बड्या अधिकार्याशी संपर्क साधला. पोलिस प्रशासनाकडून सकाळपासून चौकशी केली गेली. त्यानंतर स्पष्ट झाले की, बुलढाणा जिल्ह्यात असा एकही मदरसा नाही, जिथे येमेनचे नागरिक राहतात. विशेष म्हणजे बुलढाण्यात येमेन देशाचा एकही नागरिक नाही आणि इतरही देशाचे नागरिक बुलढाणा जिल्ह्यात बेकायदेशीररित्या राहत नसल्याचा निर्वाळा सदर पोलिस अधिकार्याने गुड इव्हिनिंग सिटीकडे केला आहे. म्हणून बुलढाणेकरांकडून नितेश राणेंनाही विनंती की, दावे किंवा विधान करतांना पूर्ण माहिती घेवूनच शहरांची नांवे घेत चला… उचलली जीभ लावली टाळूला करू नये.. उगाच बुलढाण्याची बदनामी होते.