बुलढाणा, 23 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः शासनाच्य हमी केंद्रावर ज्वारी विक्री केलेल्या शेतकर्याला बिल अदा करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारीकडून 70 हजार रूपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. सदर प्रकरणी 25 हजार रुपयांचा पहिली इन्स्टॉलमेंट घेतांना जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन नंदकिशोर टेकाळे याला त्याच्या पंटरसह आज रंगेहाथ पकडण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातच अॅन्टी करप्शन ब्यूरोच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला. या कारवाईनंतर मात्र महसुल विभागासह जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. एसीबीने तात्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी टेकाळे याच्या चिखली निवासस्थानाची झाडाझडती घेतली.
अॅन्टी करप्शन ब्यूरोने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार धाड परिक्षेत्रातील एका शेतकर्याने शासनाच्या हमी भाव केंद्रावर विक्री केली आहे. या ज्वारीचे बिल निघण्यास कोणतीही अडचण येवू नये यासाठी तसेच भविष्यात ज्वारी विक्रीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकार्याकडून 70 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे यासदंर्भात एसीबीने 21 जुलै आणि 22 जुलै असे दोन दिवस खातरजमा केली. जिल्हा पुरवठा अधिकारी टेकाळे हा सेवानिवृत्त कर्मचारी देवानंद खंडागळे याच्या मार्फत सदर शेतकर्याशी लाचेचा व्यवहार करीत होता. तडजोडीअंती 50 हजार रुपये देण्याचे निश्चीत झाले. त्यातील 25 हजार रूपये लाचेचा पहिला हप्ता घेवून शेतकरी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात आज दुपारी पोहोचला. साध्या वेशातील एसीबीच्या पथकानेही कार्यालयात सापळा रचला होता. याचवेळी लाच स्वीकारतांना जिल्हा पुरवठा अधिकारी टेकाळे यांस रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यासोबतच खंडागळेलाही ताब्यात घेण्यात आले. या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान एसीबीच्या एका पथकाने टेकाळेच्या चिखली येथील निवासस्थानाची झाडाझडती घेतली. टेकाळे सासर्याकडे राहत असल्याचे कळते. त्याठिकाणी मात्र एसीबीला रोख रक्कम मिळून आली नाही. इकडे मात्र जिल्हा प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. एसीबीच्या या यशस्वी कारवाईचे श्रेय एसीबीचे पीआय रमेश पवार, विलास गुंसीगे, सफौ शाम भांगे, हेकाँ प्रविण बैरागी, राजेंद्र क्षीरसागर, पोना जगदीश जवार, रंजीत व्यवहारे, शैलेश सानेवणे, गजानन गाल्डे, पोकाँ स्वाती वाणी, नितिन शेटे अॅन्टी करप्शन ब्युरो बुलढाणा यांनी पार पाडली. पोलिसांनी गजानन टेकाळे यांना न्यायालयात उपस्थित केले आहे अशी माहिती गुड इव्हिनिंग सिटीला मिळाली आहे.