पाडळीच्या अशोक मगरला 3 वर्षे, अशोकच्या आई-वडीलांना प्रत्येकी एक-एक वर्ष कारावास
बुलढाणा, 23 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका 16 वर्षीय युवतीचा विनयभंग करून तिचे वडील, आजी दोघांना दगडाने जखमी करणार्या अशोक समाधान मगर वय २६ वर्षे यांस न्यायालयाने 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या भांडणात अपराधी अशोकला त्याचे वडील समाधान आणि आई सौ. गिता यांनीही मदत केली होती. अशोकच्या आई-वडीलांनाही विशेष न्यायाधीश श्रीमती एम.व्ही. देशपांडे यांनी प्रत्येकी एक-एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री यांनी प्रस्तुत केलेले पुरावे आणि प्रखर युक्तीवाद परिणामकारक ठरला.
गुड इव्हिनिंग सिटीला सरकारी वकील कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार पाच वर्षांपूर्वी, 25 फेब्रुवारी 2020 रोजी 16 वर्षीय पिडीता गावातील तलावावर धुणे धुण्यासाठी गेली होती. दुपारी 12 वाजेच्या सुमारास तिच्या मागे मागे अशोक समाधान मगर आला आणि तिला गाठून म्हणाला की, माझे तुझ्यावर प्रेम आहे.. यावर पिडीतेने त्याला झिडकारले व म्हटले की, मला त्रास देवू नको. मी भावाला सांगेल… याने चिडून जावून अशोकने पिडीतेला हाताच्या मिठीत घेवून जोरात दाबले.. त्याच्या तावडीतून सुटून युवती पळत घरी आली आणि तिने सदर घटना आजी, भाऊ व वडीलांना सांगितली. तितक्यात अशोक घरासमोर आला आणि पिडीत युवतीसह तिच्या कुटूंबियांना शिवीगाळ करू लागला. वडील आणि आजीने अशोकला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु अशोकने हातात दगड घेवून वडीलांच्या कपाळावर मारला. त्यांरूा कपाळातून रक्त निघू लागले. नंतर अशोकची आई सौ. गिता वय 36 वर्षे आणि वडील समाधान मैयफत मगर वय 47 वर्षे घटनास्थळी पोहोचले. त्यांनीही पिडीतेच्या कुटूंबियांना लोटपाट करून शिवीगाळ केली. गिता मगरने विटकर घेवून पिडीत युवतीच्या आजीच्या गालावर मारली. आमच्या नादाला लागले तर जीवानिशी मारून टाकून, अशी धमकी देवून आरोपी अशोक आणि त्याचे आई-वडील निघून गेले. जखमी वडील आणि आजीला दवाखान्यात भरती करण्यात आले. याप्रकरणी पिडीतेने बुलढाणा ग्रामिण पोलिसांना घटनेची फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी अशोक आणि त्याच्या आई-वडीलांविरोधात कलम 354 अ, 354 ड, 323, 324, 504, 506 सह कलम 34 तसेच कलम 08 पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदविला होता. तपास पीआय एम.एन. सातदिवे यांच्याकडे होता. विशेष न्यायालयात प्रकरण दोषारोपपत्रासह दाखल झाले.
विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री यांनी सरकारी पक्षातर्फे एकुण 10 साक्षीदार तपासले. अॅड. खत्री यांनी न्यायालयासमोर नोंदविलेल्या एकुण पुराव्याच्या माध्यमातून पिडीता ही अल्पवयीन असल्याची तसेच आरोपी पिडीतेचा विनयभंग करून आरोपींना साक्षीदारास मारहाण करून शिवीगाळ केल्याच्या पुराव्यासह न्यायालयासमोर उपलब्ध केली. सदर प्रकरणातील युक्तीवाद आणि पुराव्यावरून विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती एम.व्ही. देशपांडे यांनी आज, 23 जुलै रोजी सदर प्रकरणी निकाल दिली. यात अपराधी अशोक समाधान मगर कलम 8 पोक्सो कायद्याअंतर्गत तीन वर्षे कारावासाची शिक्षा तसेच दोन हजार रूपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा तसेच कलम 323 भादंविमध्ये एक वर्षे सश्रम कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास अपराधी अशोकला 15 दिवसांची सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. शिक्षेची हीच तरतूद कलम 506 नुसार करण्यात आली. तर अशोकचे वडील आरोपी समाधान मगर यास कलम 323 नुसार एक वर्षे सश्रम कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास15 दिवसांची सश्रम कारावासाची शिक्षा तसेच कलम 506 अन्वये एक वर्षे सश्रम कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास अपराधी समाधानला 15 दिवसांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. आरोपीची आई सौ. गिता हिला कलम 323 अन्वये एक वर्षे सश्रम कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास 15 दिवसांची सश्रम कारावासाची शिक्षा तसेच कलम 506 भादंवि अन्वये एक वर्षे सश्रम कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आणि ंड न भरल्यास सौ. गिता यांना 15 दिवसांची सश्रम कारावासाची शिक्षा विशेष न्यायालयाने सुनावली आहे.
सदर प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री यांनी कामकाज पाहिले. कोर्ट पैरवीची जबाबदारी हेकाँ शेखर थोरात यांनी पार पाडली.