spot_img

हुमणीने शेतकर्‍यांची दमछाक; पालकमंत्र्यांची डोळेझाक !

शेतकरी अडचणीत असतांना पालकमंत्री मकरंद पाटील यांचे बुलढाण्याकडे दुर्लक्ष

बुलढाणा, 25 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी/अजय काकडे) ः पालकमंत्री पद हे संबधीत जिल्ह्याचे पालकत्व म्हणून दिले जाते. पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा प्रथम नागरिक असतो. अनेकवेळा शेतकरी संघटना व विविध राजकीय पक्ष हे पालकमंत्री हरविल्याच्या तक्रारी पोलिस स्टेशन व तहसील तसेच इतर कार्यालयला देतांनाच्या बातम्या येत असतात. पालकमंत्री जिल्ह्यात दिसले नाही म्हणून असा प्रकार केला जातो. बुलढाण्यात शेतकरी हा हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे हवाल दिल झाला असतांना पालकमंत्र्यांनी याकडे डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना पालकमंत्री करावे अशी आग्राही मागणी लावून धरली होती. त्यावेळी आ.गायकवाड यांनी सांगितले होते की, दुसर्‍या जिल्ह्याचे पालकमंत्री असले तर ते झेंडावंदन आणि नियोजन समितीच्या बैठका सोडून कधी फिरकत नाही. त्याचबरोबर स्थानिकचा पालकमंत्री असल्यास त्यांना प्रश्‍नांची जाण असते. ते सोडविण्यासाठी ते प्रयत्न करतात असे सांगितल्यावर ही स्थानिकचा पालकमंत्री नेमण्यात आले नाही. जिल्ह्यात जून महिन्यात लोणार व मेहकर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामध्ये हजारो एकर शेत हे पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी तर माती वाहून गेल्यामुळे मुरूम उघडा पडला. विहीर जमिनदोस्त झाल्या. पालकमंत्री हे स्वतः राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री असल्यामुळे हे सर्व बाबी त्यांच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार सिध्दार्थ खरात, सिंदखेड राजाचे आमदार मनोज कायंदे, माजी आमदार डॉ.संजय रायमुलकर यांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांची भेट घेवून त्यांना नुकसान भरपाईची मागणी केली होती.
त्यानंतर पुन्हा आता लोणार तालुक्यात मुसळधार पावसामुळे पेरणी केलेल्या शेताचे नुकसान झाले आहे. तसेच सोयाबीन वर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे. अनेक शेतकर्‍यांनी तर सोयाबीनच्या पिकावर रोटाव्हेटर फिरवले आहे. हुमणी अळीचा प्रदुर्भाव दिवसेंदिवस वाढतांना दिसून येत आहे. चिखलीच्या आमदार श्‍वेताताई महाले यांनी याबाबत विधीमंडळात हुमणी अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदतीची मागणी केली. परंतू पालकमंत्र्यांना मात्र याची साधी पाहणी व याबाबत बुलढाण्यात येवून एखादी बैठक घेत प्रशासनाला पंचनामे व नुकसान भरपाईबाबत आदेश कारावे वाटले नाही. शेतकरी हा मेटाकुटीला आला असतांना पालकमंत्री डोळेझाक करतांना दिसून येत आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकर्‍यांना युरीया मिळत नाही. त्यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तर जिल्हा कृषी अधीक्षकांवर गंभीर आरोप करत त्यांचे युरिया कंपनीसोबत साटेलोटे असल्याचे सांगितले. शेतकरी अडचणीत असतांना पालकमंत्र्यांनी 15 ऑगस्टच्या आधी जिल्हा दौरा करून शेतकर्‍यांना मदत द्यावी. कालच 24 जुलै रोजी भरोसा येथील थुट्टे या शेतकरी दाम्पत्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. तसेच कैलास नागरे यांच्या मुलांच्या शिक्षणाची शासनाने जबाबदारी स्विकारली परंतू अद्याप पावले उचली नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी याची दखल घ्यावी अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत