बुलढाणा, 1 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थीती भयावह आहे. मराठवाडा, विदर्भात सर्वाधिक कहर आहे. पिकांचे, शेतजमीनीचे, जनावरांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अशा संकटकाळी विविध स्तरातून मदतीचा ओघ सुरु आहे. विशेष म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी आणि शेतकरी यांचे नाते केवळ प्रशासनिक नसून भावनिक आहे. कृषी सहाय्यक नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करणे, पंचनामे तयार करणे, नुकसानाचे वास्तव शासनापर्यंत पोहोचविणे आणि मदत वितरणाची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी कर्तव्यनिष्ठेने पार पाडतात. शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे ही नैतिक जबाबदारी असल्याचे म्हणत महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषि अधिकारी संघटनेने महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीकरीता राज्यातील सर्व सहाय्यक कृषि अधिकारी यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता देण्याचे घोषित केले आहे. सदर मदत थेट अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशी अपेक्षा व्यक्त करतांना संघटनेने म्हटले आहे की, या संकटकाळी आम्ही शेतकऱ्यांसोबत असल्याची भावना आम्ही उचललेल्या पाऊलामुळे दृढ होईल. राज्यभरात सुमारे 10 हजार सहाय्यक कृषी अधिकारी असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना मदत जाहीर करण्यासंदर्भातील पत्रावर सहा. कृषी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विलास रिंढे आणि सरचिटणीस महेंद्र गजभिये यांची स्वाक्षरी आहे.
दूसरीकडे, महसुल कर्मचारी संघटनेनेही एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वर्ग करण्याची घोषणा केली आहे. दोन दिवसांपूर्वी 29 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेने शेतकरी बांधवांना मदतीचा हात म्हणून एक दिवसाचे वेतन जमा करण्यासाठी सहमती दर्शविली. संघटनेचे राज्याचे सरचिटणीस किशोर हटकर यांनी गुड इव्हिनिंग सिटीला याबाबत कळविले असून जिल्हाधिकारी किरण पाटील यांना सोमवारी बुलढाणा जिल्हा शाखेच्या वतीने वेतन कपात करण्याबाबत निवेदनही देण्यात आले. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष किशोर हटकर, सरचिटणीस गजानन मोतेकर यांची स्वाक्षरी आहे. निवेदन देतेवेळी मिलींद पाटील, अभिजीत पिंजरकर, श्रीमती मोगल, श्रीमती इंगळे, दिनकर राठोड, अनंता कहाते तसेच इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कृषी आणि महसुल दोन्ही कर्मचारी संघटनांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद असून त्यांच्या संवेदनशीलतेची साक्ष्य देणारे आहे.
—
Good Evening City



