मोताळा बिडीओ अशोक काळे ॲक्शन मोडवर
बुलढाणा, 5 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : शासकीय घरकुल योजनेच्या हप्त्यांचे वितरण करताना काही दलाल लाभार्थ्यांची आर्थिक लूट करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा दलालांवर लगाम कसण्यासाठी मोताळा गटविकास अधिकारी पदाचा नुकताच प्रभार घेतलेल्या अशोक काळे यांनी विशेष पाऊल उचलले आहे. सरपंच मंडळींना आवाहन करीत श्री काळे यांनी दलालांविरोधात कारवाईसाठी तक्रार करण्याचे म्हटले आहे. यासंदर्भात व्हिडिओ श्री काळे म्हणतात की, घरकुलांचे हप्ते वितरित करताना काही दलाल लाभार्थ्यांकडून हप्ते काढून देण्याच्या नावावर आर्थिक लूट करीत आहे. वास्तविक हप्ता वितरण करणे हे पंचायत समितीचे काम आहे. पंचायत समितीतील आपल्या गावचे ग्रामपंचायत अधिकारी, गृहनिर्माण अभियंता तसेच गटविकास अधिकारी यांची कर्तव्य बद्धता आहे की लाभार्थ्याला त्याचा हप्ता वेळेवर आणि मंजूर निधीप्रमाणे मिळावा. परंतु लाभार्थ्याच्या मजबुरीचा फायदा घेऊन काही दलाल त्यांना हप्ता मिळवून देण्यासाठी आर्थिक लोट करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. सरपंच मंडळींनी थेट लाभार्थ्याशी चर्चा करून त्यांना दलालांपासून सावध करावे. जर असे काही दलाल आढळल्यास त्यांच्या विरोधात पंचायत समितीकडे तक्रार करावी. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा बिडीओ अशोक काळे यांनी दिला आहे. श्री काळे यांनी दोनच दिवसांपूर्वी बिडिओ पदाचा प्रभार हाती घेतला आहे. दलाल आणि भ्रष्टाचार विरोधात त्यांनी उचललेले पहिले पाऊल कौतुकास्पद असून त्यांच्या या भूमिकेचे मोताळा पंचायत समिती अंतर्गत सरपंच मंडळींकडून स्वागत होत आहे.



