भाजपकडून बोगस मतदारांची यादी पुराव्या निशी सादर
बुलढाणा, 7 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : नगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूक मतदार यादी कार्यक्रम -२०२५ अंतर्गत मतदार यादी प्रसिद्ध करणे बाबत स्थानिक पातळीवर प्रक्रिया सुरू झालेली असून स्थानिक स्वराज्य संस्थांना १ जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार याद्या आगामी निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे या यादीवर भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे व शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनी आक्षेप नोंदवून बोगस व पुनरावृत्ती झालेले मतदार वगळण्याची मागणी सहपालकमंत्री ना.संजय सावकार व जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे ४ ऑक्टोबर २०२५ रोजी केली आहे. या निवेदनावर सहपालक मंत्री यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना चौकशीचे आदेश दिले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, बुलढाणा विधानसभा मतदार संघातील जवळपास ३५४६ मतदार हे पुन्हा पुन्हा नोंदणी केलेले आहे, त्याच प्रमाणे बुलढाणा शहरातही जवळपास ८०० मतदार पुन्हा पुन्हा नोंदणी केलेली आहे तर काही मृतकांची नावे आजही मतदार यादीत समाविष्ट आहे. सदर पुनरावृत्ती झालेले मतदान हे निर्णायक स्वरूपाचे ठरू शकते, राजकीय हस्तक्षेप करून ही नावे हेतू पुरस्कर पुन्हा नोंदवली गेल्याचे दिसून येत आहे. या नावांचे सूक्ष्म अवलोकन केले असता नाव, वय, पत्ता व यादी भाग क्रमांक यामध्ये बऱ्यापैकी साधर्म्य आढळत आहे. अशी बोगस मतदारांची यादीच पुराव्या निशी जोडून जिल्हा प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे. असा प्रकार संपूर्ण यादीत मोठ्या स्वरुपात झालेला दिसून येत आहे. अश्या बोगस व मृत मतदारांना मुळे निवडणुकांची पारदर्शकता व विश्वासार्हता कमी होत असून आदर्श आचारसंहितेचा भंग होणार आहे.
अशी पुनरावृत्ती झालेली व मृत मतदारांची नावे तात्काळ स्वरूपात BLO मार्फत स्थळ निरीक्षण करून वगळण्यात यावी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रशासकाना ही नावे वगळण्या साठी आदेशीत करून त्या बाबतचा शिक्का त्या नावांवर मारून अद्ययावत याद्या प्रसिद्ध करण्यात याव्यात अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. अशी माहिती भाजपा चे शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनी प्रसिद्धी माध्यमाना दिली आहे.