बुलढाणा, 13 डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : आमदार श्वेताताई महाले आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यातील कलह सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांचे काँग्रेसशी संबंध सलोख्याचे नाहीत. नागपूर येथे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यासाठी आमदार श्वेताताई महाले या नागपुरात आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे काही आंदोलनाला भेट देण्यासाठी व विजय वडेट्टीवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नागपूरला गेले आहे. हर्षवर्धन सपकाळ आणि आ.श्वेताताई महाले यांची भेट माजी मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमादरम्यान झाली आहे. यावेळी त्यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बुलढाणा येथील जयस्तंभ चौकात काँग्रेसचे तात्कालिन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची गाडी भाजप पदाधिकाऱ्यांनी अडवली होती. यामध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता. हा वाद एवढा टोकाला गेला की हे प्रकरण बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. याप्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये आमदार श्वेताताई महाले यांनी तक्रार दाखल केली होती. शिविगाळ केल्याच्या तक्रारीवरून हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.



