न्यायालयाकडून बुलढाणा नगर पालिकेला खरमरीत पत्र
बुलढाणा, १७ डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः बुलढाणा न्यायालयाने नगर पालिका प्रशासनाला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असे पत्र दिले आहे. बुलढाणा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.विजय सावळे यांनी व बार असोसिएशनचे सदस्यांनी जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक यांच्याकडे भटक्या कुत्र्यांचा बदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज १७ डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालय बुलढाणा चे प्रबंधक यांनी बुलढाणा नगर पालिकेच्या मुख्याधिकार्यांना याबाबत पत्र दिले आहे. न्यायालयाचे प्रबंधक यांनी दिलेल्या पत्रात नमूद आहे की, जिल्हा न्यायालया आवारामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर फार वाढला आहे. त्यामुळे विधीज्ञ व पक्षकार यांना कुत्र्यांपासून चावा घेण्याचा धोका निर्माण झाला आहे. भटक्या कुत्र्यांनी १२ डिसेंबर रोजी एका महिला पक्षकाराला चावा घेतला होता. त्यामुळे विधीज्ञांमध्ये जास्त रोष आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
देशातील भटक्या कुत्र्यांच्या धोक्याच्या मुद्द्यावर महिन्याभरापूर्वी सुप्रीम कोर्टाने भूमिका घेतली. सर्वोच्च न्यायालयाने शाळा-महाविद्यालये, रुग्णालये, बसस्टँड आणि रेल्वेस्थानकांवर कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. आठ आठवड्यांच्या आत या ठिकाणांहून कुत्रे कोंडवाड्यात हलवण्याचे आदेश अधिकार्यांना दिले. महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवरून भटके प्राणी आणि गुरेढोरे हटवण्याचे निर्देशही कोर्टाने एनएचएआयला दिले.
न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन.व्ही. अंजारिया यांच्या विशेष खंडपीठाने अनेक निर्देश जारी केले. न्यायालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकार्यांना दोन आठवड्यांच्या आत अशा संस्थांची ओळख पटवण्याचे निर्देश दिले. कुत्र्यांना प्रवेशापासून रोखण्यासाठी परिसराभोवती पुरेसे कुंपण, सीमा भिंती आणि दरवाजे बसवल्याची खात्री करण्याचे निर्देश या संस्थांच्या प्रशासकीय प्रमुखांना देण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ जानेवारी रोजी होईल. रेबीजग्रस्त मुलांविषयी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानंतर कोर्टाने २८ जुलैला स्वतःहून सुनावणी सुरू केल्याचे नमूद केले. ३ नोव्हेंबरला न्यायालयाने सांगितले की ते संस्थात्मक क्षेत्रात कुत्र्यांच्या चाव्याच्या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी अंतरिम सूचना जारी केल्या.
आता बुलढाणा नगर पालिका यासंदर्भात काय पाऊल उचलते ते समजेल. बुलढाणा शहरातील अनेक भागांमध्ये सुध्दा कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहे. मोकाट कुत्रे हे रस्त्यावर बसतात व त्या ठिकाणावरून जाणार्या येणार्यांवर अचानक हल्ला करतात. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी झाली होती.



