बुलढाणा, 19 डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : येथील लहाने लेआउट नजीकच्या चौपाटी जवळ असलेल्या बाहेकर यांच्या कॉम्प्लेक्स मध्ये थोड्या वेळापूर्वी आग लागली. भाजप नेते जगदेव बाहेकर यांच्या निवासस्थानाच्या खाली असलेल्या दुकानांमध्ये ही आग लागली होती. पर्वणी ड्राय फ्रुटमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचे कळते. जेव्हा आग लागण्याचे लक्षात आले तेव्हा तातडीने आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. परंतु आगीने जोर पकडला होता. नगर परिषदेचे अग्निशमन वाहन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. अनिरुद्ध जाधव हे सदर दुकानाचे मालक आहेत. यात त्यांच्या मालाचे किती नुकसान झाले, हे तूर्तास सांगता येणार नाही. परंतु भर चौकातील दुकानांमध्ये आग लागल्यामुळे शेकडो लोकांची गर्दी या परिसरामध्ये जमा झाली होती. सर्क्युलर रोड वर वाहतूक कोंडी झाली होती.



