व्याख्यान, रॅली व भव्य शोभायात्रेचे आयोजन
बुलढाणा, 5 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : मेवाडचे शूरवीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त ७ ते ९ मे या कालावधीत बुलढाणा शहरात सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. व्याख्यान संमेलन, मोटरसायकल-कार रॅली, उपासना व भव्य शोभायात्रेच्या माध्यमातून शहरात उत्साहाचे व देशभक्तीचे वातावरण निर्माण होणार आहे.
महाराणा प्रताप जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात ७ ते ९ मे दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. क्षत्रिय राजपूताना संघ, राष्ट्रीय राजपूत करणी सेना व महाराणा प्रताप सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या उत्सवामुळे शहरात उत्सवी वातावरण राहणार आहे.
७ मे : व्याख्यान संमेलनाने होणार प्रारंभ
उत्सवाचा प्रारंभ बुधवारी, ७ मे रोजी सायंकाळी गांधी भवन येथे होणाऱ्या व्याख्यान संमेलनाने होईल. सुप्रसिद्ध कवी विक्रांतसिंह ठाकूर हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. अर्चित हिरोळे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी सुकेश झंवर राहतील. यावेळी डॉ. भगतसिंग राजपूत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
८ मे : मोटरसायकल-कार रॅलीने शहर दणाणणार
गुरुवारी, ८ मे रोजी सायंकाळी भव्य मोटरसायकल व कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन होईल. या वेळी मृत्युंजय गायकवाड, गणेश सिंह राजपूत, दिलीपराव जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भगवे झेंडे, महाराणा प्रताप यांच्या घोषणांनी शहर दुमदुमणार आहे.
९ मे : उपासना व भव्य शोभायात्रा
शुक्रवारी, ९ मे रोजी सकाळी उपासना होणार असून दुपारी महाराणा प्रताप भवन ते कारंजा चौक या मार्गावर भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रेचे उद्घाटन आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या हस्ते होईल. हर्षवर्धन सपकाळ, विजयराज शिंदे, संजय राठोड यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रा निघणार आहे.
आयोजकांचे आवाहन
महाराणा प्रताप यांच्या शौर्य, त्याग व स्वाभिमानाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शहर व जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.