‘भाजपला वापरून फेकून देणारे प्रतापराव नकोत..’ : मॅसेज व्हायरल
बुलढाणा, ९ मार्च (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत): ‘वेळीच व्हा सावध, नाहीतर व्हाल सावज!’.. अशी आर्त हाक देत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार द्या, अशी मागणी करणारा एक मॅसेज सोशल मिडीयावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. अर्थातच भाजप पदाधिकारी आणि सदस्यांच्या व्हॉट्स ग्रुपवर फिरणाऱ्या या मॅसेजच्या खाली विनित म्हणून ‘बुलढाणा जिल्ह्यातील भाजप प्रेमी मतदार’, लिहीलेले आहे. खा. प्रतापराव जाधव यांच्या कुण्या विरोधकाने ही पोस्ट तयार केली असावी, असा जरी अनुमान काढला तरी ती पोस्ट एका ग्रुपमधून अनेक ग्रुपमध्ये व्हायरल होत आहे. अर्थात व्हायरल करणारे भाजपचे कार्यकर्तेही प्रतापराव जाधव यांना कंटाळले की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महायुतीकडून शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांना पुन्हा उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चीत असल्याचे कळते. शिवसेना, धनुष्यबाण शिंदे गटाकडेच आहे. त्यातच राज्यातील खासदारांच्या नेतृत्वस्थानी असणाऱ्या नेत्यांपैकी प्रतापराव जाधव एक आहेत. त्यांनी खासदारकीची हॅटट्रीक केलेली आहे. सलग चौथ्यांदा विजयी झाले तर त्याला ‘हाऊल’ (haul) म्हणतात.. प्रतापरावांची तयारी पूर्ण आहे. परंतु शिंदे गटाला तीन ते चार जागा कमी करून त्याजागी भाजप आपले उमेदवार देणार आणि ज्या जागी कमी होतील, त्यात बुलढाणा एक आहे, अशी दाट शक्यता राजकीय विश्लेषकांना वाटते. मागील आठवड्यात आ. श्वेताताई महाले, आ. डॉ. संजय कुटे यांची नावे भाजपकडून लोकसभा निवडणूकीसाठी चर्चेत राहिलीत. धुंवा उठा है, तो आग जरूर लगी होगी. त्यातच भाजपच्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत असलेल्या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टची सुरुवात बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा, असे म्हणून करण्यात आली. पोस्टच आशय असा की, ‘हा मतदारसंघात भाजपचे नवखे सुखदेव काळे बहुमताने विजयी झाले होते. हा मतदारसंघ भाजप बहुल मतदारांचाच आहे. तीन आमदार भाजपचे आहेत. बूथ नेटवर्कसुद्धा आहे. याउलट शिवसेना उमेदवार खा. जाधव यांच्याकडे बुथ नेटवर्क नाही. सेनेत फूट पडल्यानंतर ५० टक्केच्यावर शिवसेना ही उबाठा पक्षात आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून बुलढाणा लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार निवडून येवू शकतो.’ व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये पुढे लिहीले आहे की, खा. जाधव हे केवळ भाजपच्याच बळावर तीन वेळा खासदार झाले. परंतु त्यांनी कधीही युतीमध्ये समन्वय, सांमजस्य किंवा सहकार्याची भूमिका घेतली नाही. त्यामुळे भाजप मतदार, नेते व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रतापराव मजबूरी है, मोदी जरूरी है.. म्हणून दोन वेळा निवडून आणले. पण आता मात्र मतदारराजा ऐकेलच याची अजिबात खात्री नाही. मतदारांच्या सहनशीलतेलाही मर्यादा आहेत. उमेदवार बदलवा नाही तर भाजप अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदीप्रेमी मतदार मतदानाला जावून नोटाचा वापर करू शकतो कारण मोदीजींसाठी ३५० प्लस खासदार निवडून येणारच आहे तर नापसंत आणि निष्क्रीय खासदार मोदीजींना बुलढाणा मधून कशाला पाठवायचा ? असा सवाल पोस्टमध्ये उपस्थित करण्यात आला आहे. विरोधी पक्षाकडे प्रबळ उमेदवार नाही.. नकारात्मक मतदान झाले तर वेगळा निर्णय लागू शकतो.. ‘प्रतापराव हे उमेदवारी जाहीर झाली की, भाजपच्या बुथ नेटवर्कचा फायदा घेतात.. गोड बोलतात.. वापरून घेतात.. नंतर पुढच्या निवडणूकीपर्यंत भाजपला विचारतच नाही.. जणू काही वापरून फेकून देतात..’, असा गंभीर आरोप करणारी ही पोस्ट भाजपच्या कुण्या निष्ठावान कार्यकर्त्याने तयार केली, हे सांगता येणार नाही परंतु परंतु गुड इव्हिनिंग सिटीला भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडून सदर व्हायरल झालेली ही पोस्ट पाठविण्यात आली आहे. ‘भाजपच्या मतदार आणि कार्यकर्ते मंडळीसाठी व जिल्ह्यात भाजप अधिक बळकट करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी धाडसी निर्णय घ्यावा, ही जाहीर विनंती’, पोस्टमध्ये नमूद आहे. असेही निवडणूकीचा काळ आहे, त्यामुळे अशा पोस्ट व्हायरल होतीलच.. काही समर्थनार्थ तर काही विरोधी पोस्ट दररोज धडकतील. याला पक्षश्रेष्ठी किंवा भाजपचे वरिष्ठ नेते किती गांभीर्याने घेतील, हे सांगता येणार नाही. पोस्ट व्हायरल केल्यापेक्षा कुणी अशा आशयाचे पत्र पक्षाला पाठविण्यात आले का? किंवा पक्षाच्या बैठकीत प्रतापराव जाधव यांना हटविण्याची मागणी केली गेली का ? तर त्याला अर्थ राहील. अन्यथा अशा पोस्ट ‘हवा में तिर और आटा कम फकीर’ ठरू शकतात.