spot_img

चाकूने हल्ला‌ करणाऱ्यास ३ वर्षाची शिक्षा

चाकूने हल्ला‌ करणाऱ्या आरोपीला ३ वर्षाची शिक्षा

शासकीय अभियोक्ता अॅड. उदय आपटेंची महत्वपूर्ण भूमिका

बुलढाणा, 3 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : पाण्याच्या टाक्या ठेवण्याच्या क्षुल्लक कारणावरून चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल आज, ३ सप्टेंबर रोजी खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सी. एम. बागल यांनी दिला. शिवाजी नगर, खामगाव येथील रहिवासी शकुंतला अंबादास जाधव यांच्या घराच्या मागे पाण्याच्या टाक्या ठेवण्यावरून १८ ऑक्टोबर २०१४ रोजी वाद झाला होता. या वादातून आरोपी भानुदास पांडुरंग अतकरे रा. शिवाजी फैल, खामगाव याने शकुंतला जाधव यांचा मुलगा शिवदास अंबादास जाधव याच्या पोटावर, छातीवर आणि खांद्यावर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले होते.
या प्रकरणी शकुंतला जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर खटला न्यायालयात प्रलंबित असतानाच्या काळात जखमी शिवदास जाधव यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सरकार पक्षाकडून एकूण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शकुंतलाबाई जाधव, सुनिता जाधव, पायल पायमोडे आणि देविदास जाधव यांची साक्ष आरोपीला दोषी ठरवण्यात अत्यंत महत्त्वाची ठरली.
तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल श्रीधर नाईक आणि तत्कालीन तपास अधिकारी शाम मथुरादास बनसोडे (पोलीस स्टेशन शिवाजी नगर) यांचीही साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली.
सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. उदय सुधाकर आपटे यांनी भक्कम युक्तिवाद करत पुरावे मांडले. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून आरोपी भानुदास अतकरे याला दोषी ठरवत ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात पोलीस तपास अधिकारी शाम बनसोडे यांनी सखोल तपास केला होता, तर कोर्ट पैरवी म्हणून राजेंद्रसिंग ठाकूर व गीता मेढा यांनी कामकाज पाहिले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत