बुलढाणा, 28 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा जिल्ह्याच्या गझल क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी या गावाचे भूमिपुत्र जेष्ठ गझलकार शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांना मानाचा HUM LIT AWARD-2026 पुरस्कार जाहीर झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यासाठी हा आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे. बुलढाणा शहरातील विविध गझल कार्यक्रमांमध्ये शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी उत्कृष्ट निवेदन सुध्दा केले आहे.
HUM FEST या संस्थेच्या वतीने दिला जाणारा HUM LIT AWARD-2026 हा मानाचा पुरस्कार सुरेश भट गझलमंच पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांना जाहीर झाला आहे. उद्या शनिवार २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता मुक्ती कल्चरल हब,अंधेरी पश्चिम येथे आयोजित भव्य गझल मुशायरा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रसिद्ध गीतकार/गझलकार जावेद अख्तर यांच्या हस्ते, देशभरातील दिग्गज मान्यवर गझलकारांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे.
गेल्या सुमारे पंधरा वर्षांपासून “सुरेश भट गझलमंच” या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विविध ठिकाणी दीडशेहून अधिक(१५७) गझलरंग मुशायऱ्यांचे आयोजन,त्याद्वारे दोनशेहून अधिक(२१५) गझलकारांनी केलेले स्वरचित गझलांचे सादरीकरण,७ गझल कार्यशाळा,११ महिला गझलकारांचे मुशायरे,१० मराठी-हिंदी-उर्दू मिले जुले मुशायरे इत्यादी उपक्रमाद्वारे मराठी गझलेच्या प्रचार-प्रसारासाठी दिलेल्या योगदानाची उचित दखल घेऊन HUM FEST या संस्थेने केलेला सार्थ गौरव म्हणजे हा पुरस्कार आहे या पुरस्काराचे सर्व श्रेय “सुरेश भट गझलमंच” चे पदाधिकारी,”गझलरंग” परिवारातील आणि महाराष्ट्रातील तमाम गझलकार आणि गझलरसिक यांचेच आहे. त्यामुळे त्यांच्या वतीने,केवळ त्यांचा प्रतिनिधी म्हणून विनम्र कृतज्ञता भावाने हा पुरस्कार स्वीकारणार असल्याचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी सांगितले.