उपोषणमंडपातून अॅम्बुलेन्सद्वारे थेट जिल्ह रूग्णालयात भर्ती
बुलढाणा, 18 जून (गुड इव्हिनिग सिटी) ः दलित समाजाच्या स्मशानभुमीवर लोणार तालुक्यातील वेणी येथे अतिक्रमण केल्याप्रकरणी 23 महिलांनी 11 जून पासून अन्नत्याग आंदोलन जिजामाता व्यापारी संकुल बुलढाणा परिसरात सुरू केले आहे. आज 18 जून रोजी त्या अन्नत्याग आदोलनाला आठ दिवस झाले आहे. त्यामधील 15 महिलांची प्रकृती खालाविल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. भरती केलेल्या महिलांमध्ये शोभा परमेश्वर जाधव, संगीता देविदास जाधव, वंदना दगडू जाधव, अंतकला दिनेश जाधव, मिनाक्षी गजानन जाधव, सविता रमेश जाधव, विमल भिमराव कटारे, सुनिता वसुदेव सरदार, अनिता मदन सरदार, बेबी रवि वाघमारे, तारामती दौलत गवई, इंदूबाई उध्दव कटारे, कल्पना संतोष सरकटे, रेखा समाधान वाघमारे यांचा समावेश आहे.
तर सध्या उपोषण मंडपात बसलेल्यांमध्ये वर्षा गौतम वाघमारे, वर्षा रवि जाधव, सुशीला उध्दव कटारे, सरस्वती वसंत इंगळे, मिना भिमराव वाघ, गंगुबाई केशव वाघमारे, लिलाबाई श्रावण कटारे, शशिकला शिवप्रसाद कटारे यांचा समावेश आहे.
प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे त्यांनी आज येळगाव धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. परंतु आज सकाळ पासूनच बुलढाणा शहर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. प्रशासनाने संबधीत महिलांसोबत चर्चा केली आहे. त्यांच्या मागण्या मान्य केल्या जाणार असल्याची माहिती प्रशासनातील सुत्रांनी दिली आहे. परंतु जोपर्यंत लेखी आश्वासन दिले जाणार नाही. तो पर्यंत मागे हटणार नाही असा इशारा दिला आहे. आपल्या निवेदनात आंदोलनकर्त्या महिलांनी आरोप केला आहे की, जिल्हाधिकारी महोदयांनी नोंदणी केलेल्या एक हेक्टर स्मशानभूमिवर गावातीलच शाम माधवराव जाधव याने बळजबरी करून अतिक्रमण केले आहे. त्याठिकाणी लावलेला निळा झेंडाही गावचे सरपंच आणि सचिव यांनी आर्थिक देवाण-घेवाण करून काढून टाकलेला आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणीही आंदोलनकर्त्या महिलांची आहे.